Friday, 29 July 2016

मान्यता..


रोजच्या सवयीप्रमाणे त्याने मोबाईल हातात घेतला, चॅट विंडो उघडली आणि तिचं "लास्ट सीन" बघितलं. वेळेचा अंदाज घेतला आणि मनाशी काहीतरी ठरवुन मोठा  मेसेज टाईप करायला घेतला. बराच वेळ काहीतरी लिहीत होता, खोडत होता, असा खेळ करून शेवटी त्याने "गुड मॉर्निंग" असा मोघम मेसेज पाठवला. तोही कुठल्याही इमॉटीकॉन शिवाय.
त्याचं असं गेले काही दिवस सारखंच चाललेलं होतं. खूप काही आहे त्याच्या मनात, बोलायचंय, सांगायचंय पण काही केला तो मोठा मेसेज काही जात नव्हता. उगा धाकधूक त्याच्या मनात की ती वाचेल ना, तिच्या ऐवजी दुसऱ्या कोणी वाचला तर, आणि precisely तिच्या नवऱ्याने वाचला तर? विचारानेच कसं  तरी होत होतं त्याला. बरं साधे सरळ रोजच्या जीवनातले विषय, नोकरी , लग्न किंवा नव्याने केलेलं लिखाण अश्या आशयाचा काहीतरी मोठा मेसेज असणार तो, पण तरी गाडी काही पुढे सरकत नव्हती. एकदा मनाचा हिय्या करून फोन करायला घेतला त्याने पण घड्याळातील काटा नवाच्या पुढे गेलेला पाहून फोन आपोआपच बंद झाला. की इतक्या उशीरा कसा फोन करायचा? शंकांचं काहूर मनात. असं काही खूप दिवस झाले नव्हते तिच्या लग्नाला... फक्त १५ दिवस.... हो हो फक्त पंधरा....

असे काही खूप दिवस नव्हते त्यांच्या मैत्रीला... इन मिन ३२० दिवसांपूर्वीची मैत्री म्हणजे पुरतं एक वर्ष पण नाही.. पण त्या काही दिवसातच त्यांची मैत्री खूप घट्ट झाली अगदी घष्ट... त्याच्या आयुष्यातलं तिला सगळा माहित आणि तिच्या आयुष्यातलं त्याला.. इथपर्यंत नाही तर एकमेकांच्या घरी पण सगळे नीट ओळखणार..

त्यांचं पण ते रोजचं  बोलणं, कधी मधी भेटणं चहा पिणं एखादा movie  बघणं, हे तर होतंच पण त्या पलीकडे एक understanding होतं, धाक होता, समजूतदारपणा होता. तिच्या लग्नात तर तो त्याच्या घरातलं कार्य असल्यासारखा वावरला जणू तिच्या आई बाबांचा उजवा हातच.

होता? भूतकाळ? past tense?  तिचं, त्याच्या बेस्ट friend चं लग्न झालं आणि सगळा वर्तमानकाळ अचानक भूतकाळात गेला?  अचानक एक कुठली भिंत मध्ये आली?

"खूप छान नवरा मिळालाय तिला, समजूतदार, कर्तृत्ववान, त्यांच्या घरातला सगळ्यात मोठा, जबाबदार, सासरच्यांची खूप काळजी घेणारा आणि पर्यायाने तिची पण काळजी घेणारा, मुळात लग्न इतक्या झटकन झालं की त्याच्याशी नीट भेटणं बोलणं पण होऊ नाही शकलं." असं तोच परवा कोणालातरी सांगत होता.
मग तरीही त्याच्या मनात काय आणि कसले प्रश्न आहेत?

कदाचित त्याला असं तर वाटत नाहीये ना की "बायकोचा मित्र" किंवा "सुनेचा मित्र" म्हणून त्याला "बायकोच्या मैत्रिणी " किंवा "सुनेच्या मैत्रिणींना" जितका मिळेल तितका मान मिळणार नाही?
एखादी गोष्ट share  करायला त्याने अचानक तिला फोने केलेला (वेळेचं भान पळून) तिच्या नवऱ्याला चालणार नाही?
तो लग्नाआधी सारखं तिला "भेटूयात का COFFEE ला?" असं विचारू शकणार नाही?
तिचा नवरा ह्याला आणि तिच्या नवऱ्याला हा एकमेकांच्या आयुष्यात समाविष्ट करून घेऊ शकणार नाही का?
 बायकोचा मित्र किंवा सुनेचा मित्र हि संकल्पना अजूनही इतकी दुर्मिळ का आहे आपल्याकडे?
त्याचं तिच्याशी असलेलं understanding तिच्या नवऱ्याशीही तितकच असेल का?
त्याला परत तिला कधीच "आज मला फक्त तुला भेटायचंय किंवा तुझ्याशीच बोलायचंय" असं म्हणता येणार नाही का?

असे काही प्रश्न बहुदा त्याच्या डोक्यात सैरावैरा पळत आहेत आणि म्हणूनच तो सैराट झालाय... हुकलाय, कळत नाहीये त्याला काय करावं ते..... तिच्या आई बाबांना भेटायला जातांना सुद्धा brave  असल्याचा खोटा आव आणतोय का तो? तिच्या आई बाबांइतकाच तोही सैरभैर झालाय का? आई बाबांची ती एकुलती एक मुलगी आहे तशी त्याची पण ती एकुलती एक Best Friend आहे ना?

आज तब्बल २२ दिवसांनी तो भेटला तिला पण काय बोलावं ते कळलं नाही त्याला, तिला पण काहीतरी चुकल्यासारखं वाटलं तेव्हा... तिच्या जागी ती १००% बरोबर आहे पण त्याच्या जागी तो?
ती सतत आहे तशीच वागतीये आहे तशीच बोलतीये पण आजूबाजूची परिस्थिती आणि situation बदललीये का पण? तिने तरी त्याला कसं  समजवावं आणि त्याने तरी तिला सगळं कसं स्पष्ट करून सांगावं?

होईल नॉर्मल सगळं कदाचित. तिच्या "नसण्याची" किंवा "मर्यादित असण्याची" सवय तो करून घेईल बहुदा. किंवा कदाचित सगळं ......... Another fairy tale का सत्य वाचन....
आणि हे सगळे त्याच्याच डोक्यातले विचार आहेत बहुदा...

तंद्रीतून बाहेर येत त्याने mobile  खिशात टाकला आणि laptop  उघडून कामाला लागला. mobile  खिशातच टाकला, साईडला नाही ठेवला, उगाच का ते मोहाचे क्षण आणि लक्ष विचलित.
जेमतेम पाच मिनिटे झाले असतील नसतील तोच त्याचा mobile  वाजला. आता कोणाचा फोन म्हणून वैतागून त्याने फोन बघितला तर स्क्रीन वर तिच्या नवऱ्याचे नाव... ह्याने फोन उचलला आणि पलीकडून शब्द उमटले, "HI, उद्या रात्री डिनर प्लॅन करतोय, आपण तिघं मस्त जेवु आणि मग एक मस्त मूवी ला जाऊ टिकेट्स मी ऑलरेडी काढली आहेत आणि हॉटेल पण ठरलंय सो, I'm not asking your permission Sir, but you have to come. ओके थांब हिच्याशी बोल... " आणि त्याने फोन कट केला... तिच्याशी ना बोलताच....     

कदाचित त्याच्या मनात आलं असेल, "ती पण अशीच ऑर्डर सोडते, असाच हट्ट करते ..... Another Fairy Tale"

स्वतःशीच हसून त्याने फोन परत खिशात नाही नाही आता साईडलाच ठेवला ..... आणि Fairy  Tale  हा शब्द घोळवत कामाला लागला.       


जुनी सवय आहे मला
बागेत जाऊन बसण्याची,
अजूनही खात्री वाटत नाही मला,
तू तिथे नसण्याची.

-ईशान कुलकर्णी 

        


                   

Sunday, 5 June 2016

"तू.."

प्रिय "तू"स,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
कशी आहेस? खर तर हे माझं तुला लिहिलेलं पहिलच पत्र. तू म्हणालीस की तुझ्याविषयी, तुझ्या आयुष्याविषयी लिहिशील का? मी जर चाटच पडलो. म्हटलं असं कसं लिहिणार आणि लिहायचं म्हटलं तरी सगळं नीट मनापासून लिहिलं पाहिजे, तुझ्याविषयी माझ्या मनात असलेल्या भावना, तुझे चांगले, वाईट गुण, आवडत्या आणि नावडत्याही गोष्टींचा उल्लेख येणार आणि जर तो नाही आला तर मग अख्खं लिखाणाच मिळमिळीत होऊन जाईल एखाद्या राजकारण्याने दिलेल्या paid  news  सारखं. पण मग म्हटलं लिहावं, लिहून तर बघू. मी पण असं कोणाविषयी direct लिहिलं  नव्हतं  कधी.
तुला आठवतं, आपल्या पहिल्या समोरासमोरील भेटीत पाऊस पडला होता. मला पाऊस अजिबात आवडत नाहीआणि तुला मात्र भयंकर आवडतो. कदाचित हा पहिला विरोधाभासच आपल्या मैत्रीची आश्वासक सुरुवात करायला कारणीभूत ठरला असावा. सप्टेंबर २०१५ मध्ये मी लिहिलेलं "क्षणभंगुर.." नावाचं  नाटक पहायला आलेलीस तू, पण नाटक झाल्यावर येउन भेटली नव्हतीस. पण मग मी तुझ्याशी फेसबुकवर बोललो पहिल्यांदा. त्यासाठी मला तुझ्या "ही" आणि "ती" अशा दोन मैत्रिणींची रीतसर परवानगी काढायला लागलेली. त्यातली "ही" तर माझीच मैत्रीण आणि "ती" माझ्या मित्राची होणारी बायको. पर्यायाने तू,ही आणि ती आता माझ्या खास मैत्रिणी. ही आणि ती दोघीही मला म्हणालेल्या की "बिनधास्त बोल "तू"शी, तिची काळजी घे, जमल्यास तिचा खूप चांगला मित्र हो, आम्ही दोघी तिथे नसतो आजकाल, तू असलास म्हणजे मग काही tension  नाही."
आणि मग finally आपण बोलायला लागलो. मग कालांतराने तू मला तुझा mobile  number  दिलास, आणि मग सुरु झाला हा सगळा प्रवास. माझा पटकन involve होणारा स्वभाव आहे तर तुझा जर सांभाळून वागण्याचा आणि मग माणूस पारखून involve होण्याचा. त्यामुळे तुझा विश्वास संपादन करायला आणि आपलं  sharing  वाढवायला मला खूप कष्ट घ्यावे लागले हे सांगायला नकोच.
तुझा एकूणच मोकळा स्वभाव आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याच्या स्वभावामुळे मी पण जर जास्तच मोकळेपणाने वागू लागलो आणि मग मला आठवतं  की तू मला चांगली तंबी दिलेलीस की "माझा मोकळेपणा हा शुद्ध मैत्रीपोटी आहे, याचा दुसरा कुठलाही अर्थ काढू नकोस" अगदी हेच वाक्य नसलं  तरी याच अर्थाचं बोलली होतीस. पण त्यात तुझी चूक नव्हती, वहावत  जाणे हा माझा स्वभावधर्मच आहे. मलाही कुठे थांबावं  हे कळत नाही.  पण मग तरी तेव्हा तू सांभाळून घेतलस.
तुझा स्वभाव खूप positive  आहे किंवा तू म्हणतेस तसा तो झालाय. तू पण खूप माती खाललीयेस आयुष्यात असं  तुझं म्हणणं आहे, कदाचित ते असेलही खरं पण तरीही तुझ्या स्वभावातला सगळ्यात पहिला गुण कुठला लक्षात येतो तो हाच positive  attitude. स्वतः बाबतीत जरा कमी पण दुसऱ्यांना  समजावतांना कमालीची optimistic असतेस तू. आरडा ओरडा करणे हाही तुझ्या स्वभावाचा एक स्थायी भाव. पण ठीके काही individual  characteristics असतात प्रत्येकाचे. माझा नाहीका, पहिला विचार कायम negative च असतो.

आयुष्यात दोनदा प्रेमात पडलीस तू. एकदा "हा" आणि मग "तो". प्रेम यशस्वी झालं  तर कोणीच काही बोलत नाही. पण फसलं तर मोठी माणसं शेण खाल्लस  आणि मित्र माती खाल्लीस असं  म्हणतात.
पण प्रेमात चूक बरोबर असं काही नसतं असं  मला वाटतं कारण त्या वेळी आपल्या मनाला तेच बरोबर वाटत असतं. त्यातल्या एका वेळी तर तुला खूप जास्त त्रास झाला. त्रास झाला का तू करून घेतलास या वादात आपण नको पडायला कारण शेवटी ज्याची जळते त्यालाच कळते. "हा" काही तुला फलदायी ठरला नाही आणि "हा" विषयी आपण जास्त बोललोच नाहीये त्यामुळे त्याविषयी जास्त भाष्य करणं योग्य दिसणार नाही.
"तो" ला किमान मी भेटलोय तरी पण त्याच्या स्वभावाचा विशेष अंदाज नाही आला पण मग तरी तो ठाम नाही वाटला कधी कायम दोलायमान आणि हे मी तुला म्हणालो पण होतो.
त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय तू एकदा नाही दोनदा घेतलास आणि त्यामुळे तुझा "ही"च्याशी आणि "ती"च्याशी जरा वाजल पण. तो निर्णय चूक होता का बरोबर हे आत्ता किंवा त्यावेळेसही सांगता आलं  नसतं. कुठल्याही निर्णयाचे पडसाद कालांतराने उमटतात. आणि मग ठरतं  की निर्णय चांगले का वाईट ते. पण "तो" पण तुला काही फलदायी ठरला नाही. "तो" साठी तू अनेक मनस्तापही सहन केलेस, परत ताण घ्यायला सुरुवात केलीस. बऱ्याच गोष्टी निश्चित करूनही आयत्या वेळेस "तो" काही हजार झाला नाही.
ह्या सगळ्यात जर काय खरा असेल तर तुझ्या मनातल्या भावना, त्याला प्रेम म्हणा, काळाची गरज म्हणा किंवा आकर्षण म्हणा पण तू कायम तुझ्या मताशी ठाम राहिलीस. आणि हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं  होतं. मग तुझं  लग्न ठरलं , काहीश्या संमिश्र भावनांत तू हा निर्णय घेतलास, अनेक चांगल्या गोष्टी दिसत आहेत, सगळा नीट पार पडतंय पण तुझ्या मनात अजूनही ही शंकाआहेच की "हाच" शी लग्न करण्याचा मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना, "हाच" हा माझा Mr. Perfect आहे ना? लग्न आणि कुटंब सगळाच नवीन असण्याने येणारे नवनवीन अनुभव तुझं  मन बावचळून टाकत आहेत. आणि राहून  राहून एकाच प्रश्न मनात येतोय की हे सगळं  का? आणि मीच का? कदाचित "ही" आणि "ती" यांचं  ठरलेलं love  marriage पाहून तुझ्या मनात शंका असेल की मग मीच arrange marriage का? कुठेतरी insecurity  आहे मनात "तू"झ्या. पण मी माझ्या आजवरच्या अनुभवाने एकच  सांगेन की our whole life is a gamble. इतरांना देण्यासाठी तुझ्यात असलेली positivity इथे तू वापर. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, अनेक भावना आहेत, अनेक शंका आहेत, अनामिक भीती आहे एकूणच लग्नाची आणि त्यानंतरच्या सगळ्याच गोष्टींची. कुठेतरी अजूनही "तू"ला असा वाटतंय की "हाच" ला तू अजूनही ओळखू शकलेली नाहीस. आणि ह्यात तुला "मी", "ही" आणि "ती" समजून घेत नाही आहोत. पण असं काही नाहीये. आम्ही तुझ्या इतकेच आनंदी आणि आशावादी आहोत. तुझं  चांगलं  व्हावं हेच आमचं ध्येय आहे.  सगळं नीट होईल.                                         
तुला सख्खा भाऊ किंवा बहिण नसल्यामुळे सगळ्या कामाचा ताण तुझ्यावर पडत आहे आणि "तू"झ्या आई बाबांवर पण. त्यामुळे तुझी होणारी घालमेल, सगळ्या गोष्टी manage करतांना होणारी ओढाताण आणि "हाच"ला द्यावा लागणारा वेळ हे सगळं manage  करतांना प्रचंड दमछाक होतेय तुझी हे मला कळतंय.
पण तरीही मी हेच म्हणेन सगळं नीट होईल. फक्त झोप पूर्ण कर नीट.

तुला राग पटकन येतो, तुला इगो पण आहे, लग्न झाल्यावर सगळे बदल फक्त "तू" च का अनुभवायचे?
तू बोलघेवडी आहेस राग जितक्या लवकर येतो तितक्या लवकर पळतो पण, आई बाबांवर मनापासून प्रेम करतेस. "ही" आणि "ती" साठी जीव ओवाळून टाकतेस, त्यांच्यासाठी possessive होतेस, खूप चांगली listener  आहेस आणि तितकीच काही बाबतीत stubborn  पण. अनोळखी लोकांशी छान बोलतेस मह तू बागेतला watchman असू दे किंवा फिरायला येणारे आजोबा किंवा hotel मधला waiter.
बडबड्या स्वभावापायी माणसं जोडतेस आणि अगदी क्वचित गमावतेस पण.
आता थोडं माझ्या मनातलं.
मला तू पहिल्या भेटीपासून आवडलीस. ह्याला मला कुठलही नाव द्यायचं नाही. मला कधीच तुझ्यासारखी मैत्रीण नव्हती. आणि हेच मला कायम तुझ्याशी जोडून ठेवतं. मी तुझ्यावर line  मारतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपली मैत्री टिकावी ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि तसच  होईल असा आशावाद मी बाळगून आहे. उगाचच मला कदाचित काही घडलं असतं  तर वगैरे असे फाटे फोडायचे नाहीत. जे होतंय ते छानच होतंय आणि चांगलंच  होतंय. आणि चांगलंच होणार.

हे सगळं  वाचून judgemental होऊ नकोस. फारसा विचारही करू नकोस. तुझं  आयुष्य फक्त माझ्या नजरेतून बघत आहेस असं समज. कुठलीही शंका मनात ठेवू नकोस. वाचून झालं  की सांग delete  करून टाकेन.
तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा.
GOD BLESS YOU               
                                                                                                                            तुझा मित्र,
                                                                                                                                "मी"      
                     

Tuesday, 17 May 2016

प्रेमपत्र……

प्रिय ….

खरतर "प्रिय……. " ही खूप औपचारिक सुरुवात वाटते नाही? आणि ती पण एका प्रेमपत्राची?
हे माझं  पहिलच आणि शेवटचं प्रेमपत्र…. कारण यापुढे कोणासाठी लिहू शकेन असं आत्ता तरी वाटत नाही.
पाहिलं प्रेमपत्र हे पहिल्या प्रेमाइतकच ताजं टवटवीत असतं. बघ ना म्हणजे प्राणाहूनही अधिक प्रिय असणाऱ्या तुला प्रेमपत्रात "प्रिय" म्हणणं ही औपचारिकता वाटायला लागली बघ.

कशी गमंत असते बघ ना, अचानक तू समोर येणं, मी तुला पाहणं  आणि तू हसून प्रतिसाद देणं ही एक साधी सरळ घटना. फार काही विशेष नाही, अश्या अनेक व्यक्तींना आपण भेटतो आणि मग विसरूनही जातो. पण तरीही तुला पाहता क्षणी असं वाटलं की तुला मनावेगळ करणं अशक्य आहे. ते तुझं पहिलं हास्य आणि पहिलं हस्तांदोलन आणि मग सुरु झालेला अख्खा प्रवास हा स्वपनवतच. हळू हळू आपण कधी बोलायला लागलो, हसायला लागलो, चर्चा करायला लागलो, अनेकदा कारणाशिवाय ही  भेटायला लागलो, सुख दुःख वाटून घ्यायला लागलो, कळलंच नाही गं. तू पहिल्या भेटीत विश्वासाने हातात दिलेला तो हात नकळत पणे इतका जवळचा कसा झाला कळलंच  नाही.
तुझं  असणं, तुझं नसणं, तू नसतांनाही आहेस असं वाटणं, तुझी वाट  बघणं, तुला येतांना बघून आपसूक केस नीट करणं, व्यवस्थित असलेला shirt पुन्हा एकदा नीट "इन" करणं, पोटात पडलेला तो खड्डा, मग प्रत्येक भेटीत माझा सवंगडीच बनून गेला.
तू अगदी सहज मारलेल्या त्या मिठीतून मला माझ्यातलं मी पण गवसलं, मला एक आत्मविश्वास आला की "येस, मी पण कोणीतरी आहे". भेटायला आल्यावर आणि निघतांना अशी दोन्ही वेळेला मारलेली ती मिठी मग प्रत्येक भेटीतल्या कॉफी इतकीच नित्याची होऊन गेली.
कोणासाठी तरी अधीर होणं, झुरणं, तळमळण, तडफडण, हे असे चेष्टा मस्करीतले शब्द माझे मित्र बनले गं. अलंकारिक वाटणारे हे शब्द मला सहज अगदी सहज बोलता यायला लागले. नव्हे अनुभवता यायला लागले. अख्खी रात्र जागून काढणं  काय असतं ते मी पहिल्यांदा अनुभवलं. तू मध्ये गावाला गेलेलीस आणि एकदम पंधरा दिवसांनी आपण भेटलो तेव्हा तू नेहेमीच्या सहजतेने मला भेटलीस पण माझ्यासाठी तो क्षण काय होता हे माझं  मलाच माहिती. एखाद्या लहान मुलाला एखादंच chocolate हवं  असतांना अचानक त्याला अख्खी बरणी उघडून दिल्यावर त्याचं काय होतं  ना अगदी तसं काहीसं झालं  बघ. आनंदाने ओरडावसं वाटत होता, नाचावंसं वाटत होतं. भावनांवर नियंत्रण ठेवणं कसं जमवलं  मी ते माझं मलाच माहिती.

खूप आनंद होतो तुला भेटल्यावर आणि खूप त्रासही होतो भेटून निरोप घेतांना. काही तासांपूर्वी भेटलेलो असतांनाही हात परत परत mobile कडे जातो, तुझं "Last Seen" पाहण्यासाठी, तुला message करण्यासाठी. आपण खूप मागे लागत नाहीयेना ही सततची शंका, तू माझा विचार करत नसतांनाही तुला काय वाटेल यावरून माझी अख्खी दिनचर्या ठरते. तुझ्या प्रत्येक वाक्याला मी "Judgemental" होतो आणि मग माझं  मत तयार होतं.
माझं  राहणं, बोलणं, वागणं, सगळं तुझ्या परिघाभोवती फिरत राहतं. तुझा प्रत्येक profile picture  मी दोनदा like केलाय, एकदा Facebook वर आणि एकदा मनात, त्या फोटोत तुझ्याशेजारी स्वतःला imagine  करून.
तुझे आणि माझे एकत्र फोटो ज्या laptop  मध्ये आहेत तो laptop  मी दिवसातून तीनदा antivirus  scan  करून घेतो. आपलं  आजवर झालेलं प्रत्येक chat मी स्वतःला email करून ठेवलय.

तू दुसऱ्या कोणाशी बोलतांना मला त्रास होतोच नक्कीच होतो. पण कुठेतरी तू तुझं माझ्यासोबत असणं  इतकं मोठं  करून टाकतेस की मग ही jealousy मग क्षुद्र वाटायला लागते. मला तुझ्यावर बेफाम होऊन प्रेम करायचं, बेधुंद होऊन प्रेम करायचय, तुझ्या त्या घट्ट मिठीच्या आवेगात स्वतःला झोकून द्यायचय, तुझे हात हातात घ्यायचेत, तुझे एखाद्या लहान मुलाप्रमाणे लाड करायचे आहेत आणि मला तुझ्याकडून करूनही घ्यायचे आहेत. तुझ्या मांडीत डोकं ठेवून झोपायचय, तुला कुशीत घ्यायचय, सकाळी उठल्यानंतर तुझ्यासाठी bed tea  करून आणायचाय, मला तुझ्यासोबत म्हातारं  व्हायचय, तुझ्या सोबत आयुष्य काढायचंय, तुझ्या प्रेमात स्वतःला आकंठ बुडवायचय.

तू करशील माझा स्वीकार? देशील मला एक संधी आपलं  आयुष्य घडवायची? होशील माझ्या साध्या आयुष्यातली माझी साधी जोडीदारीण? मोठ मोठ्या बाता मारता येत नसल्या तरी एक नक्की सांगेन आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा सकाळी उठून बाजूला बघशील तेव्हा तुला पश्चात्ताप होणार नाही असा आयुष्य नक्की घालवशील माझ्यासोबत. तुझ्या उत्तराची……… 

हा शेवटचा परिच्छेद मुद्दाम खोडला, आणि हा नवीन लिहायला घेतला, खूप छान वाटलं परवा  तू मला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिलीस. लग्नानंतर तिथेच म्हणजे अमेरिकेत settle  होण्याचा plan  आहे. हे ऐकून थोडा त्रास झाला पण खरच खूप अभिमान वाटला. हे खरतर एक प्रेमपत्र होतं, आता ते फक्त पत्र आहे. वाचून चिडू नकोस judgemental होऊ नकोस. तुझ्यासाठी लिहिलेलं त्यामुळे तुला देऊन टाकणं भाग आहे. माझ्या मनावरचा ताण उतरला. तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काळजी घे आणि संपर्कात रहा.

                                                                                                                      तुझा  …… 

ता. क. आजही हे पत्र माझ्या माळ्यावरच्या पेटीत जसं  च्या तसं  पडून आहे पत्ता न टाकलेल्या पांढऱ्या शुभ्र पाकिटात.    

  
                                         
                   







Thursday, 12 May 2016

सैराट…. का?

आज खरच खूप दिवसांनी लिहायला घेतलं… अगदी मोजायचं म्हटलं तर तब्बल तीन वर्षांनी. काही विशेष असं कारण नाही पण कशावर तरी लिहावं  असा खरच आतून वाटलं नाही. व्यक्त व्हावं  असं  वाटलं  नाही.
मागच्या आठवड्यात शुक्रवारी (६ मे २०१६) रोजी "सैराट.." नावाचा चित्रपट पहिला.
नागराज मंजुळे लिखित आणि दिग्दर्शित, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू अभिनित, "सैराट…" आणि त्याला अजय-अतुल यांचं  कमाल संगीत…. हा चित्रपट पहिल्यानंतर मनात काहीतरी खदखदतय… काहीतरी वरचेवर मनात येतंय…. म्हटलं  आज कागदावर उतरवावेत हे विचार…

तसं गेल्या सहा महिन्यात "कट्यार काळजात घुसली (२०१५)" आणि "नटसम्राट (२०१६)" हे दोन अप्रतिम चित्रपट सुद्धा आले आणि सुपरहिट झाले. पण त्या चित्रपटाशी असं  आतून connect  नाही होता आलं. कट्यार हा एका संगीत नाटकावर बेतलेला किंबहुना संगीतप्रधान चित्रपट. कानाला निरातिशय सुख देणारा चित्रपट… भव्य सेट आणि तगड्या कलाकारांची फौज…. पण एक सामान्य माणूस म्हणून तो चित्रपट आतवर असा खोलवर रुजत नाही.
तशीच काहीशी  गत "नटसम्राट" ची. "नाना पाटेकरांचा" अत्त्युच्च अभिनय आणि एकूणच "वी वा शिरवाडकर सरांचं" लेखन हे अद्भुत combination जुळून आलेलं पण तरीही एक सामान्य माणूस म्हणून मी त्या चित्रपटाशी आतून नाही connect होऊ शकत. ती गोष्ट मला माझी नाही वाटत. एका मोठ्या अभिनेत्याचं पडद्यामागचं  आयुष्य जरी सामान्य माणसासारखं असलं तरीही ते व्यक्ती म्हणून सामान्य नाहीतच. पण तरीही हे दोन चित्रपट कुठेतरी कायम स्मरणात राहतील. दुनियादारी, टाईमपास, टाईमपास २, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दगडी चाळ, अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, असे अनेक चांगले चित्रपट पहिले पण त्याविषयी लिहिलं  नाही काही पण मग "सैराट"च का?

सिनेमा पाहून तब्बल आठ दिवस उलटूनही तो इतक्या खोलवर का रुजलाय? का त्यातले पात्र, त्यातले संवाद, त्यातली गाणी, त्याचा पूर्वार्ध इतके आपले का वाटतात? का ती इतकी जवळची वाटते कि अक्ख्या महाराष्ट्राने हा सिनेमा इतका डोक्यावर का घ्यावा? ११ दिवसात ४१ कोटी!!!
२-३ वेळा पाहूनही लोकांचं समाधान होत नाहीये?
माझ्यापुरतं  बघायचं झालं  तर त्या चित्रपटाच्या पूर्वार्धात दाखवलेली गोष्ट इतकी खरी आहे आणि इतकी तंतोतंत जुळते आपल्या बालपणाशी, आपल्या पौगंडावस्थेतल्या प्रेमाशी, आपल्या शालेय वा कनिष्ठ महाविद्यालयातल्या दिवसांशी.

रेल्वेच्या आवाजावर नाचणं , नदीत पोहणं, शेतात भटकण, हे तर आहेच पण त्याही पलीकडे आपल्याला आवडणाऱ्या मुलीची एक झलक मिळवण्यासाठी वाटेल ते करायची तयारी, (मी सुद्धा मला आवडणाऱ्या मुलीला पाहण्यासाठी सकाळी लवकर उठून सायकल चालवायला जायचो न मग बराच वेळ त्याच त्याच रस्त्यावर परत परत सायकल आणणं असं  मी पण केलंय.) वर्गात जास्त मार्क्स पडणाऱ्या मुलाविषयी आपसूक वाटणारी उत्सुकता, मनातलं कळवण्यासाठी चिठ्ठीचा खुबीने केलेला वापर, मग त्या चिठ्ठीचं उत्तर येईपर्यंत मनाची होणारी घालमेल,  क्वचित प्रसंगी यशस्वी होणारं  प्रेम, न नाहीच झालं  तर हसत हसत  पचवलेला तो प्रेमभंग, जीवाला जीव देणारे मित्र, असं  सगळं आपण थोड्याफार फरकाने जगलेलो असतो.  

विशेष लक्षात राहतं  ते आर्ची हे पात्र… बिनधास्त, प्रामाणिक आणि मनापासून प्रेम करणारं. खरं  बोलणारं, डोळ्यातुन  बोलणारं. आर्ची आणि परश्या यांचं  प्रेम पण तितकच खरं  आणि त्या वयातलं  वाटतं,
कुठेही भपकेबाजपणा नाही, बॉलीवूडीकरण नाही.
उत्तरार्धाच्या सुरुवातीला प्रेमातूनच वास्तवाची करून दिलेली जाणीव, आणि त्यातून विशेषतः आर्चीची होणारी तडफड, प्रेम तर मिळालं  पण पण भुकेचं  काय?

सिनेमाच्या शेवटाविषयी मी काहीच बोलू शकत नाही.

पण तरीही लक्षात राहतो तो सिनेमाचा पूर्वार्ध, त्यातले संवाद, त्यातली भाषा, आणि लंगड्या बाळ्या सारखे मित्र, परश्या आणि आर्ची, त्यांचं  नातं, त्यांची धडपड, चोरून भेटणं, नकळत एकमेकांना हात लावणं, एकमेकांकडे बघणं, फोनवर बोलतांना जेवण्याचा आग्रह करणं, झाडावर बसणं, रंग खेळणं, सगळच आपलं असं  स्वतःच,
खोलवर रुतलेलं,……त्यांची ती भाषा, ते संवाद, अगदी आपले वाटतात..

आणि त्यावर सगळ्यात सुंदर असं उत्कट प्रेम जे प्रत्येकाने एकदा तरी केलेलं  असणारच.….              
सिनेमातून कोणी काय घ्यावं  हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला मात्र पुर्वार्धाने आयुष्यातील एका पोकळीची जाणीव करून दिली.

ज्यांना असं प्रेम लाभलं  असेल त्यांना खूप शुभेच्छा आणि ज्याचं एकतर्फी होतं त्यांना अतिविशेष शुभेच्छा.

वाद, चर्चा तर होणारच, पण सध्या "सैराट"च्या या सैराट यशाचा आनंद घेउ…

बाकी तुम्ही काळजी घ्या, हसत राहा आणि फिट राहा…  



              

Tuesday, 22 January 2013

बाप...

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

मुलाशी मात्र त्यांचं मित्रात्त्वाचं नातं असता!
आजकालच्या जगात अगदी फेसबुकवर अकाउंट देखील असतं 
महिन्याच्या शेवटला फक्त बेरजा वाजबाक्यांचच गणित असतं 
पण मुलाची इच्छा पुरवायला पाकीट सदैव मोकळंच असतं!!

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

मुलीशी असलेलं नातं शब्दातीत नसतं
तिचं सगळं चांगलं व्हावं एवढंच मनात असतं 
कधी कधी ते जरा कडक शिस्तीचंही असतं!!
मुलगी सासरी जातांना सगळ्यात जास्त पाणी त्यांच्याच डोळ्यात असतं!!

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

आयुष्य मात्र त्यांचं खूप कष्टाचं असतं 
एकाच वेळी तीन पिढ्यांच्या जबाबदारीचा असतं 
कधी शिणलेलं, कधी थकलेलं , कधी मुद्दाम केलेल्या ओव्हर टाईमचं असतं
कारण स्वतःपेक्षा कुटुंबाचं सुख त्यांच्या खर्चाच्या गणितात बसतं!!!

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

फक्त जबाबदारी उचुलूनच शरीर थकतं
सदांकदा दुस्र्यांचाच विचार हे ब्रीद वाक्य असतं 
बदल्यात एखाद्या प्रेमाच्या शब्दाची अपेक्षा फक्तं 
पाय चेपून घेतांना सुद्धा मुलाचं हात दुखेल हेच दिसतं 

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र वेगळच असतं!!

आपलं मन पण किती वेडं असतं 
बाप नावाच्या मित्राला उगा घाबरत असतं 
त्याने घेऊन दिलेल्या वस्तूंच्या रुपातच त्याची किंमत करतं 
दूर राहिल्यावरच मात्र त्यांचं  खरं अस्तित्व कळतं 

कारण...
मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

Tuesday, 8 January 2013

It's all about priorities.....

जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं 
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

लहानपणी सारंच निराळं असतं 
शाळा हेच आपलं जग असतं 
वाटावाटी करून खाणं आद्य कर्तव्य असतं 
मनात एक आणि तोंडात दुसरं असं काही नसतं 
निरागसता हे मैत्रीचं पाहिलं वैशिष्ट्य असतं 
शिक्षा आणि गाभुळलेल्या चिंचांचे झाड एकत्रच उपभोगलेलं असतं!!!

तरीपण.......
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

शाळेनंतर कॉलेज एक अद्भूत जग असतं 
नाविन्याची कास धरून नवतारुण्य अवतरलेलं  असतं 
नवीन भावना आणि नवीन ओळखी यांचं वेगळंच नातं असतं 
नवीन विश्व फारच मजेशीर आणि आकर्षक असतं 
नाविन्याच्या ओघात जुनं  ते मागे पडलेलं  असतं 
जुनं  तेच सोनं  असते आणि नवीन ते मृगजळ असते हे काही कळालेलं नसतं  
मैत्रीचं अद्भुतरम्य जग घरच्यांपेक्षाही जवळचं बनलेलं असतं 

तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

शिक्षण संपल्यानंतर निराळच वाढून ठेवलेलं असतं 
करियर नावाचं जोखड मानेवर लादलेलं असतं 
स्वतःचं  तेवढं पहावं  इतकं  संकुचित ते जग असतं 
नाविन्यातले सगळं अधिकच दूर गेलेलं भासतं  
जुने ते मागेच सरलेलं असतं 
सोबतीची खरी गरज आहे हे खूप उशीरा कळतं 
इगो नावाच्या विकाराने मन अधिकच ग्रासतं!!!

तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

आपल्यासाठी फार थोड्या जणांचं हृदय जळत असतं 
जनरेशनच्या  फरकामुळे आधीच त्यांना मागे  टाकलेलं असतं 
आपलं  मन मात्र त्यांना सोडून भलत्याच्याच पाठीमागे भरकटत असतं 
आपल्याला फक्त ह्याचंच वाईट वाटत असतं 
की आपल्यावाचून त्यांचं काहीच अडत नसतं 
तरी त्यांच्यासाठी मन मात्र तीळ तीळ  तुटत असतं 
ह्यातूनच खोलवर मन निराशेच्या गर्तेत रुतत असतं 
It's all about priorities असं म्हणणं सोपं असतं!!!!

तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

ह्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहित  नसतं 
ज्यांना माहित असतं त्यांचा आपल्याला ऐकायचं  नसतं   
आपल्याला आपलंच दुःख कुरवाळत बसायचं असतं 

तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

पण शेवटी ह्या सगळ्याच्या पलीकडे पोहोचतो आपण
कारण लक्षात राहते ती फक्त आठवण 
 नक्की भेटायचे वायदे करतो जोपण 
दरवेळी पुढे करतो कारण 
ती वेळ काही कधी येताच नाही 

कारण 
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं 
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

Thursday, 24 May 2012

हाच तो गार वारा...

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
भर दुपारी गरम होत असतांना येणारी एक हलकीशी वाऱ्याची झुळूक, पहिल्या पावसाच्या आधी त्याच झुळूकेबरोबर येणारा मातीचा वास, ऐन थंडीत अंगावर काटे आणणारी बोचरी वाऱ्याची झुळूक,
अनेक अर्थ, अनेक भावना, अनेक आठवणी, अनेक प्रसंग, पण झुळूक तीच..... प्रत्येकाचा वेगळं असं नातं... त्या झुळूकेसोबत प्रत्येकाची एक अनामिक ओढ......
त्या झुळूकेला शब्दबद्ध केलंय एका कवितेच्या रुपात..... बघा आवडतिये का, आणि कोणाची किंवा कशाची आठवण येतीये का? मला नक्की कळ्वा. तोपर्यंत मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत रहा....

आणि तो गार वारा.....
वैशाखवणव्यात थंडावा देणारा
पहिल्या पावसात मातीचा सुगंध आणणारा,
हिवाळ्यात मात्र अंगावर काटे आणणारा
हाच तो गार वारा...!!

पानाफुलातून सळसळणारा,
छपरांवर चढून पाहणारा,
सुंदर सुगंध वाहून आणणारा,
हाच तो गार वारा...!!

बेधुंदपणे वाहणारा,
अभावितपणे घांगावणारा,
आपल्याच मस्तीत जगणारा,
हाच तो गार वारा...!!

हळूच मानेस स्पर्शून जाणारा,
आतून हवाहवासा वाटणारा
स्पर्शाचा अर्थ समजावून सांगणारा,
हाच तो गार वारा...

एकटेपणात सोबत करणारा,
मनाशी गुजगोष्टी करणारा,
आठवणीत नेऊन रमवणारा,
हाच तो गार वारा...!!

भावना उचंबळवून आणणारा,
मन भूतकाळात नेणारा,
गोड भविष्याची स्वपे दाखवणारा,
हाच तो गार वारा....!!



पण...

सिमेंटच्या जंगलात हरवणारा,
अस्तित्त्वासाठी दुसऱ्यावर विसंबणारा,
अगणित कचऱ्याचे ओझं वाहणारा,
हाच तो गार वारा...!!