Tuesday, 20 December 2011

असेही एक पोटपाल......


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो
खूप कविता तारुण्य किंवा प्रेम अश्या सगळ्या आवडत्या विषयावर करून झाल्या. आता ठरवलं की एखादा सामाजिक विषय हाताळावा. आणि मी सध्याचा सगळ्यात ज्वलंत विषय निवडलाय. वाचताना ओघाने कळेलच काय आहे तो. 
मग नक्की वाचा आणि मला कळवा तुमचा अभिप्राय. तोपर्यंत मजा करा काळजी घ्या आणि मला असेच भेटत रहा.     



खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

पहाटेच्या स्वप्नांनंतर सकाळची चाहूल लागते 
दात घासण्या आधीच जिभेला चहाची चटक लागते.
चहासोबत बिस्कीट असावेच लागते 
तीन हक्काचे आणि तिनं आग्रहाचे असे सोपे गणित असते.

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

स्वीकारचे पोहे की काटाकीरची मिसळ, नक्की ठरत नसते
पण रोज कोण्या एकाची बोहनी करायची असते 
मध्येच एक दिवस वैशालीचा डोसा दिसू लागतो
एकाने पोट भरत नाही आणि तवाही गरमच असतो.

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

दुपारचे जेवण नीट जेवायचे असते
पंचपक्वान्न नसले तरी साग्रसंगीत तरी असावेच लागते
घरचे वा डब्यातले, ऑफिसमधले वा हॉटेलचे, जेवण मात्र असेच असते
कुठेही बसून खाल्ले तरी पोटात हेच रीच्वायचे असते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!


संध्याकाळी भेटीची वेळ ठरलेली असते
अशा भेटीत पाणीपुरीची रंगत न्यारीच असते
दोघात एक घेऊ असे मग ठरते 
त्यालाच कळते जे कोण मग शेवटी बील भरते!!

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

रात्री घरी जेवतांना घरच्या अन्नाची महती कळते 
वाढतं वय नावाखाली एक पोळी जास्तीची पानात पडते
भाताशिवाय आमचे पान हलत नसते
दही का वरण इतकेच नेमके ठरवायचे असते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

जेवण झाल्यावर आईस क्रीम काय लागते म्हणून सांगावे
आईस क्रीम खाल्यामुळे आम्लपित्त होत नाही असे रोज म्हणावे
"कसलं सुंदर होतं ते फ्लेवर" नेमके कोणीतरी वदावे
आलोय न आज मग खाऊनच बघावे

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

वर्षभर सणांची रेलचेलच असते
प्रत्येक सणाला मात्र गोडाधोडाची मांदियाळीच असते
कितीही मोठा झालास तरी पौष्टिक लाडूची प्रत्येकाला गरज असते
डिंकाचे कि खारीक-खोबऱ्याचे आईला परफेक्ट ठाऊक असते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

श्वास ओढून पोट आत दाबता येत असते
बेल्ट लाऊन विजारीत खुपस्ताही येत असते
अशाही परिस्थितीत कोणीतरी आपल्या दिशेला बघून हसत असते 
फक्त आपल्याला हसत असते की आपल्याकडे बघून हे मात्र कधीच कळत नसते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

व्यायाम शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठीला रग लागते
उद्या नक्की करू म्हणून आज वेळ निघून जात असते
आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्यासाठी नसतेच 
असे कायम मन मारून हसरे तोंड आजूबाजूला बघत असते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

Saturday, 10 December 2011

मनातलं द्वंद्व


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो
कवितेच्या रुपातलं हे माझं १२ व रत्न. मनावर सगळ्यात जास्त राज्य करतात त्या आठवणी मग त्या चांगल्या असोत वा वाईट. त्या आठवणी आणि त्यांच्याशी निगडीत भावनांवर लिहिलेली ही कविता
जरा जड जाऊ शकते समजायला पण नीट वाचली तर नक्की कळेल आणि पटेलही. बघा कळतिये का आणि कळल्यावर पटतिये का?

मला नक्की कळ्वा तुमचा अभिप्राय आणि तो पर्यंत मजा करा काळजी घ्या आणि मला असेच भेटत राहा.   





एकट्या तृषार्त मनाला,
सहवासाची तहान लागते 
आठवणींच्या मृगजळाला ते 
पाणी समजू लागते!!

कितीही मागे पळाले तरी
ते मात्र दूरच पळते,
कितीही पकडायचे म्हटले 
तरी आपले बळ कमीच पडते!!

कालांतराने मात्र मृगजळाचे चक्रव्यूह होते
अधिकच गुंतून पडल्याने 
मन अभीमन्युसारखे वागते!!!

बाहेर पडण्याच्या व्यर्थ झटापटीत
अधिकच गुंतून पडते 
जणू स्वतःच्या विणलेल्या जाळ्यात 
स्वतःच रुतून बसते!!

त्या जाळ्याशी झगडत असताना
एक मात्र सपशेल विसरते 
कि प्रत्यक्षात ते जाळे मात्र
दुसऱ्यानेच विणलेले असते!!

झगडता झगडता जाळे विणण्यात निष्णात
अश्या कोळ्याचे किटकात रुपांतर होते
आणि कोठूनच वाट सापडत नाही म्हणून
आहे तिथेच फतकल मारून बसते

पण एक मात्र नक्कीच असते 
आयुष्य मात्र आठवणीन्च्याच रुपात मनावर ठसते 
चांगल्या असो व वाईट
मन त्यांचेच रवंथ करत बसते

आठवणींचे प्रत्येक जाळे 
 एक अनुभव होऊन बसते
चांगले ते पटकन विसरून 
वाईट तेवढं दीर्घकाळ स्मरणात राहते

तरी मन पुन्हा पुन्हा आठवते 
कारण प्रत्येक आठवण 
एकतर आशीर्वाद ठरते
नाहीतर आयुष्यभर आठवेल असा धडा बनते!!!


Saturday, 19 November 2011

तुझं असणं......


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येतात, नातेवाईक येतात, त्यांच्या येण्याने किंवा नुसतं असण्याने आपलं आधीचे आयुष्य पार बदलून जाते. आणि आपल्याला त्याची प्रचीती वेळोवेळी येत असते. अश्या सर्व व्यक्तींना हि कविता अर्पण. तुम्ही पण तुमच्या अश्या कुठल्या व्यक्तींना ही कविता ऐकवा न मला कळवा कशी वाटली ते. तो पर्यंत काळजी घ्या मजा करा आणि मला असेच भेटत राहा.  
 माझं येणं म्हणजे अकाली पावसाचं येणं
आणि तुझं येणं म्हणजे पावसानंतर इंद्रधनुष्य प्रकटण!

माझं असणं म्हणजे डबक्यात पाणी साठणं
आणि तुझं असणं म्हणजे त्याच पाण्यात कमळ उमलण!

माझं असणं म्हणजे रानात गवताचं उगवणं
आणि तुझं असणं म्हणजे त्याच गवतावर दवबिंदू पडणं!!

माझं असणं म्हणजे चार भिंतींचा गाभारा बांधणं
आणि तुझं असणं म्हणजे त्या गाभाऱ्यात मूर्तीमंत पावित्र्य आणणं!!

माझं असणं म्हणजे नुसताच पोकळ पावा असणं
आणि तुझं असणं म्हणजे त्या पाव्यातुन सप्त सूर उमटण!!

माझं असणं म्हणजे लोखंड होऊन जाळण
पण तुझं असणं म्हणजे परीस स्पर्शाने त्या लोखंडाच सोनं होणं!!

माझं असणं म्हणजे नुसता कापसाचा आणि तेलाचा दिवा असणं
आणि तुझं असणं म्हणजे तीमिरातुनी तेजाकडे नेणारा प्रकाश बनणं

माझं असणं म्हणजे फक्त हाडा-मांसाच शरीर असणं
आणि तुझं असणं म्हणजे एक अंतरात्मा होऊन त्या शरीरात वास करणं.