रोजच्या सवयीप्रमाणे त्याने मोबाईल हातात घेतला, चॅट विंडो उघडली आणि तिचं "लास्ट सीन" बघितलं. वेळेचा अंदाज घेतला आणि मनाशी काहीतरी ठरवुन मोठा मेसेज टाईप करायला घेतला. बराच वेळ काहीतरी लिहीत होता, खोडत होता, असा खेळ करून शेवटी त्याने "गुड मॉर्निंग" असा मोघम मेसेज पाठवला. तोही कुठल्याही इमॉटीकॉन शिवाय.
त्याचं असं गेले काही दिवस सारखंच चाललेलं होतं. खूप काही आहे त्याच्या मनात, बोलायचंय, सांगायचंय पण काही केला तो मोठा मेसेज काही जात नव्हता. उगा धाकधूक त्याच्या मनात की ती वाचेल ना, तिच्या ऐवजी दुसऱ्या कोणी वाचला तर, आणि precisely तिच्या नवऱ्याने वाचला तर? विचारानेच कसं तरी होत होतं त्याला. बरं साधे सरळ रोजच्या जीवनातले विषय, नोकरी , लग्न किंवा नव्याने केलेलं लिखाण अश्या आशयाचा काहीतरी मोठा मेसेज असणार तो, पण तरी गाडी काही पुढे सरकत नव्हती. एकदा मनाचा हिय्या करून फोन करायला घेतला त्याने पण घड्याळातील काटा नवाच्या पुढे गेलेला पाहून फोन आपोआपच बंद झाला. की इतक्या उशीरा कसा फोन करायचा? शंकांचं काहूर मनात. असं काही खूप दिवस झाले नव्हते तिच्या लग्नाला... फक्त १५ दिवस.... हो हो फक्त पंधरा....
असे काही खूप दिवस नव्हते त्यांच्या मैत्रीला... इन मिन ३२० दिवसांपूर्वीची मैत्री म्हणजे पुरतं एक वर्ष पण नाही.. पण त्या काही दिवसातच त्यांची मैत्री खूप घट्ट झाली अगदी घष्ट... त्याच्या आयुष्यातलं तिला सगळा माहित आणि तिच्या आयुष्यातलं त्याला.. इथपर्यंत नाही तर एकमेकांच्या घरी पण सगळे नीट ओळखणार..
त्यांचं पण ते रोजचं बोलणं, कधी मधी भेटणं चहा पिणं एखादा movie बघणं, हे तर होतंच पण त्या पलीकडे एक understanding होतं, धाक होता, समजूतदारपणा होता. तिच्या लग्नात तर तो त्याच्या घरातलं कार्य असल्यासारखा वावरला जणू तिच्या आई बाबांचा उजवा हातच.
होता? भूतकाळ? past tense? तिचं, त्याच्या बेस्ट friend चं लग्न झालं आणि सगळा वर्तमानकाळ अचानक भूतकाळात गेला? अचानक एक कुठली भिंत मध्ये आली?
"खूप छान नवरा मिळालाय तिला, समजूतदार, कर्तृत्ववान, त्यांच्या घरातला सगळ्यात मोठा, जबाबदार, सासरच्यांची खूप काळजी घेणारा आणि पर्यायाने तिची पण काळजी घेणारा, मुळात लग्न इतक्या झटकन झालं की त्याच्याशी नीट भेटणं बोलणं पण होऊ नाही शकलं." असं तोच परवा कोणालातरी सांगत होता.
मग तरीही त्याच्या मनात काय आणि कसले प्रश्न आहेत?
कदाचित त्याला असं तर वाटत नाहीये ना की "बायकोचा मित्र" किंवा "सुनेचा मित्र" म्हणून त्याला "बायकोच्या मैत्रिणी " किंवा "सुनेच्या मैत्रिणींना" जितका मिळेल तितका मान मिळणार नाही?
एखादी गोष्ट share करायला त्याने अचानक तिला फोने केलेला (वेळेचं भान पळून) तिच्या नवऱ्याला चालणार नाही?
तो लग्नाआधी सारखं तिला "भेटूयात का COFFEE ला?" असं विचारू शकणार नाही?
तिचा नवरा ह्याला आणि तिच्या नवऱ्याला हा एकमेकांच्या आयुष्यात समाविष्ट करून घेऊ शकणार नाही का?
बायकोचा मित्र किंवा सुनेचा मित्र हि संकल्पना अजूनही इतकी दुर्मिळ का आहे आपल्याकडे?
त्याचं तिच्याशी असलेलं understanding तिच्या नवऱ्याशीही तितकच असेल का?
त्याला परत तिला कधीच "आज मला फक्त तुला भेटायचंय किंवा तुझ्याशीच बोलायचंय" असं म्हणता येणार नाही का?
असे काही प्रश्न बहुदा त्याच्या डोक्यात सैरावैरा पळत आहेत आणि म्हणूनच तो सैराट झालाय... हुकलाय, कळत नाहीये त्याला काय करावं ते..... तिच्या आई बाबांना भेटायला जातांना सुद्धा brave असल्याचा खोटा आव आणतोय का तो? तिच्या आई बाबांइतकाच तोही सैरभैर झालाय का? आई बाबांची ती एकुलती एक मुलगी आहे तशी त्याची पण ती एकुलती एक Best Friend आहे ना?
आज तब्बल २२ दिवसांनी तो भेटला तिला पण काय बोलावं ते कळलं नाही त्याला, तिला पण काहीतरी चुकल्यासारखं वाटलं तेव्हा... तिच्या जागी ती १००% बरोबर आहे पण त्याच्या जागी तो?
ती सतत आहे तशीच वागतीये आहे तशीच बोलतीये पण आजूबाजूची परिस्थिती आणि situation बदललीये का पण? तिने तरी त्याला कसं समजवावं आणि त्याने तरी तिला सगळं कसं स्पष्ट करून सांगावं?
होईल नॉर्मल सगळं कदाचित. तिच्या "नसण्याची" किंवा "मर्यादित असण्याची" सवय तो करून घेईल बहुदा. किंवा कदाचित सगळं ......... Another fairy tale का सत्य वाचन....
आणि हे सगळे त्याच्याच डोक्यातले विचार आहेत बहुदा...
तंद्रीतून बाहेर येत त्याने mobile खिशात टाकला आणि laptop उघडून कामाला लागला. mobile खिशातच टाकला, साईडला नाही ठेवला, उगाच का ते मोहाचे क्षण आणि लक्ष विचलित.
जेमतेम पाच मिनिटे झाले असतील नसतील तोच त्याचा mobile वाजला. आता कोणाचा फोन म्हणून वैतागून त्याने फोन बघितला तर स्क्रीन वर तिच्या नवऱ्याचे नाव... ह्याने फोन उचलला आणि पलीकडून शब्द उमटले, "HI, उद्या रात्री डिनर प्लॅन करतोय, आपण तिघं मस्त जेवु आणि मग एक मस्त मूवी ला जाऊ टिकेट्स मी ऑलरेडी काढली आहेत आणि हॉटेल पण ठरलंय सो, I'm not asking your permission Sir, but you have to come. ओके थांब हिच्याशी बोल... " आणि त्याने फोन कट केला... तिच्याशी ना बोलताच....
कदाचित त्याच्या मनात आलं असेल, "ती पण अशीच ऑर्डर सोडते, असाच हट्ट करते ..... Another Fairy Tale"
स्वतःशीच हसून त्याने फोन परत खिशात नाही नाही आता साईडलाच ठेवला ..... आणि Fairy Tale हा शब्द घोळवत कामाला लागला.
जुनी सवय आहे मला
बागेत जाऊन बसण्याची,
अजूनही खात्री वाटत नाही मला,
तू तिथे नसण्याची.
-ईशान कुलकर्णी