नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येतात, नातेवाईक येतात, त्यांच्या येण्याने किंवा नुसतं असण्याने आपलं आधीचे आयुष्य पार बदलून जाते. आणि आपल्याला त्याची प्रचीती वेळोवेळी येत असते. अश्या सर्व व्यक्तींना हि कविता अर्पण. तुम्ही पण तुमच्या अश्या कुठल्या व्यक्तींना ही कविता ऐकवा न मला कळवा कशी वाटली ते. तो पर्यंत काळजी घ्या मजा करा आणि मला असेच भेटत राहा.
माझं येणं म्हणजे अकाली पावसाचं येणं
आणि तुझं येणं म्हणजे पावसानंतर इंद्रधनुष्य प्रकटण!
माझं असणं म्हणजे डबक्यात पाणी साठणं
आणि तुझं असणं म्हणजे त्याच पाण्यात कमळ उमलण!
माझं असणं म्हणजे रानात गवताचं उगवणं
आणि तुझं असणं म्हणजे त्याच गवतावर दवबिंदू पडणं!!
माझं असणं म्हणजे चार भिंतींचा गाभारा बांधणं
आणि तुझं असणं म्हणजे त्या गाभाऱ्यात मूर्तीमंत पावित्र्य आणणं!!
माझं असणं म्हणजे नुसताच पोकळ पावा असणं
आणि तुझं असणं म्हणजे त्या पाव्यातुन सप्त सूर उमटण!!
माझं असणं म्हणजे लोखंड होऊन जाळण
पण तुझं असणं म्हणजे परीस स्पर्शाने त्या लोखंडाच सोनं होणं!!
माझं असणं म्हणजे नुसता कापसाचा आणि तेलाचा दिवा असणं
आणि तुझं असणं म्हणजे तीमिरातुनी तेजाकडे नेणारा प्रकाश बनणं
माझं असणं म्हणजे फक्त हाडा-मांसाच शरीर असणं
आणि तुझं असणं म्हणजे एक अंतरात्मा होऊन त्या शरीरात वास करणं.