Tuesday, 17 May 2016

प्रेमपत्र……

प्रिय ….

खरतर "प्रिय……. " ही खूप औपचारिक सुरुवात वाटते नाही? आणि ती पण एका प्रेमपत्राची?
हे माझं  पहिलच आणि शेवटचं प्रेमपत्र…. कारण यापुढे कोणासाठी लिहू शकेन असं आत्ता तरी वाटत नाही.
पाहिलं प्रेमपत्र हे पहिल्या प्रेमाइतकच ताजं टवटवीत असतं. बघ ना म्हणजे प्राणाहूनही अधिक प्रिय असणाऱ्या तुला प्रेमपत्रात "प्रिय" म्हणणं ही औपचारिकता वाटायला लागली बघ.

कशी गमंत असते बघ ना, अचानक तू समोर येणं, मी तुला पाहणं  आणि तू हसून प्रतिसाद देणं ही एक साधी सरळ घटना. फार काही विशेष नाही, अश्या अनेक व्यक्तींना आपण भेटतो आणि मग विसरूनही जातो. पण तरीही तुला पाहता क्षणी असं वाटलं की तुला मनावेगळ करणं अशक्य आहे. ते तुझं पहिलं हास्य आणि पहिलं हस्तांदोलन आणि मग सुरु झालेला अख्खा प्रवास हा स्वपनवतच. हळू हळू आपण कधी बोलायला लागलो, हसायला लागलो, चर्चा करायला लागलो, अनेकदा कारणाशिवाय ही  भेटायला लागलो, सुख दुःख वाटून घ्यायला लागलो, कळलंच नाही गं. तू पहिल्या भेटीत विश्वासाने हातात दिलेला तो हात नकळत पणे इतका जवळचा कसा झाला कळलंच  नाही.
तुझं  असणं, तुझं नसणं, तू नसतांनाही आहेस असं वाटणं, तुझी वाट  बघणं, तुला येतांना बघून आपसूक केस नीट करणं, व्यवस्थित असलेला shirt पुन्हा एकदा नीट "इन" करणं, पोटात पडलेला तो खड्डा, मग प्रत्येक भेटीत माझा सवंगडीच बनून गेला.
तू अगदी सहज मारलेल्या त्या मिठीतून मला माझ्यातलं मी पण गवसलं, मला एक आत्मविश्वास आला की "येस, मी पण कोणीतरी आहे". भेटायला आल्यावर आणि निघतांना अशी दोन्ही वेळेला मारलेली ती मिठी मग प्रत्येक भेटीतल्या कॉफी इतकीच नित्याची होऊन गेली.
कोणासाठी तरी अधीर होणं, झुरणं, तळमळण, तडफडण, हे असे चेष्टा मस्करीतले शब्द माझे मित्र बनले गं. अलंकारिक वाटणारे हे शब्द मला सहज अगदी सहज बोलता यायला लागले. नव्हे अनुभवता यायला लागले. अख्खी रात्र जागून काढणं  काय असतं ते मी पहिल्यांदा अनुभवलं. तू मध्ये गावाला गेलेलीस आणि एकदम पंधरा दिवसांनी आपण भेटलो तेव्हा तू नेहेमीच्या सहजतेने मला भेटलीस पण माझ्यासाठी तो क्षण काय होता हे माझं  मलाच माहिती. एखाद्या लहान मुलाला एखादंच chocolate हवं  असतांना अचानक त्याला अख्खी बरणी उघडून दिल्यावर त्याचं काय होतं  ना अगदी तसं काहीसं झालं  बघ. आनंदाने ओरडावसं वाटत होता, नाचावंसं वाटत होतं. भावनांवर नियंत्रण ठेवणं कसं जमवलं  मी ते माझं मलाच माहिती.

खूप आनंद होतो तुला भेटल्यावर आणि खूप त्रासही होतो भेटून निरोप घेतांना. काही तासांपूर्वी भेटलेलो असतांनाही हात परत परत mobile कडे जातो, तुझं "Last Seen" पाहण्यासाठी, तुला message करण्यासाठी. आपण खूप मागे लागत नाहीयेना ही सततची शंका, तू माझा विचार करत नसतांनाही तुला काय वाटेल यावरून माझी अख्खी दिनचर्या ठरते. तुझ्या प्रत्येक वाक्याला मी "Judgemental" होतो आणि मग माझं  मत तयार होतं.
माझं  राहणं, बोलणं, वागणं, सगळं तुझ्या परिघाभोवती फिरत राहतं. तुझा प्रत्येक profile picture  मी दोनदा like केलाय, एकदा Facebook वर आणि एकदा मनात, त्या फोटोत तुझ्याशेजारी स्वतःला imagine  करून.
तुझे आणि माझे एकत्र फोटो ज्या laptop  मध्ये आहेत तो laptop  मी दिवसातून तीनदा antivirus  scan  करून घेतो. आपलं  आजवर झालेलं प्रत्येक chat मी स्वतःला email करून ठेवलय.

तू दुसऱ्या कोणाशी बोलतांना मला त्रास होतोच नक्कीच होतो. पण कुठेतरी तू तुझं माझ्यासोबत असणं  इतकं मोठं  करून टाकतेस की मग ही jealousy मग क्षुद्र वाटायला लागते. मला तुझ्यावर बेफाम होऊन प्रेम करायचं, बेधुंद होऊन प्रेम करायचय, तुझ्या त्या घट्ट मिठीच्या आवेगात स्वतःला झोकून द्यायचय, तुझे हात हातात घ्यायचेत, तुझे एखाद्या लहान मुलाप्रमाणे लाड करायचे आहेत आणि मला तुझ्याकडून करूनही घ्यायचे आहेत. तुझ्या मांडीत डोकं ठेवून झोपायचय, तुला कुशीत घ्यायचय, सकाळी उठल्यानंतर तुझ्यासाठी bed tea  करून आणायचाय, मला तुझ्यासोबत म्हातारं  व्हायचय, तुझ्या सोबत आयुष्य काढायचंय, तुझ्या प्रेमात स्वतःला आकंठ बुडवायचय.

तू करशील माझा स्वीकार? देशील मला एक संधी आपलं  आयुष्य घडवायची? होशील माझ्या साध्या आयुष्यातली माझी साधी जोडीदारीण? मोठ मोठ्या बाता मारता येत नसल्या तरी एक नक्की सांगेन आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा सकाळी उठून बाजूला बघशील तेव्हा तुला पश्चात्ताप होणार नाही असा आयुष्य नक्की घालवशील माझ्यासोबत. तुझ्या उत्तराची……… 

हा शेवटचा परिच्छेद मुद्दाम खोडला, आणि हा नवीन लिहायला घेतला, खूप छान वाटलं परवा  तू मला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिलीस. लग्नानंतर तिथेच म्हणजे अमेरिकेत settle  होण्याचा plan  आहे. हे ऐकून थोडा त्रास झाला पण खरच खूप अभिमान वाटला. हे खरतर एक प्रेमपत्र होतं, आता ते फक्त पत्र आहे. वाचून चिडू नकोस judgemental होऊ नकोस. तुझ्यासाठी लिहिलेलं त्यामुळे तुला देऊन टाकणं भाग आहे. माझ्या मनावरचा ताण उतरला. तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काळजी घे आणि संपर्कात रहा.

                                                                                                                      तुझा  …… 

ता. क. आजही हे पत्र माझ्या माळ्यावरच्या पेटीत जसं  च्या तसं  पडून आहे पत्ता न टाकलेल्या पांढऱ्या शुभ्र पाकिटात.    

  
                                         
                   







Thursday, 12 May 2016

सैराट…. का?

आज खरच खूप दिवसांनी लिहायला घेतलं… अगदी मोजायचं म्हटलं तर तब्बल तीन वर्षांनी. काही विशेष असं कारण नाही पण कशावर तरी लिहावं  असा खरच आतून वाटलं नाही. व्यक्त व्हावं  असं  वाटलं  नाही.
मागच्या आठवड्यात शुक्रवारी (६ मे २०१६) रोजी "सैराट.." नावाचा चित्रपट पहिला.
नागराज मंजुळे लिखित आणि दिग्दर्शित, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू अभिनित, "सैराट…" आणि त्याला अजय-अतुल यांचं  कमाल संगीत…. हा चित्रपट पहिल्यानंतर मनात काहीतरी खदखदतय… काहीतरी वरचेवर मनात येतंय…. म्हटलं  आज कागदावर उतरवावेत हे विचार…

तसं गेल्या सहा महिन्यात "कट्यार काळजात घुसली (२०१५)" आणि "नटसम्राट (२०१६)" हे दोन अप्रतिम चित्रपट सुद्धा आले आणि सुपरहिट झाले. पण त्या चित्रपटाशी असं  आतून connect  नाही होता आलं. कट्यार हा एका संगीत नाटकावर बेतलेला किंबहुना संगीतप्रधान चित्रपट. कानाला निरातिशय सुख देणारा चित्रपट… भव्य सेट आणि तगड्या कलाकारांची फौज…. पण एक सामान्य माणूस म्हणून तो चित्रपट आतवर असा खोलवर रुजत नाही.
तशीच काहीशी  गत "नटसम्राट" ची. "नाना पाटेकरांचा" अत्त्युच्च अभिनय आणि एकूणच "वी वा शिरवाडकर सरांचं" लेखन हे अद्भुत combination जुळून आलेलं पण तरीही एक सामान्य माणूस म्हणून मी त्या चित्रपटाशी आतून नाही connect होऊ शकत. ती गोष्ट मला माझी नाही वाटत. एका मोठ्या अभिनेत्याचं पडद्यामागचं  आयुष्य जरी सामान्य माणसासारखं असलं तरीही ते व्यक्ती म्हणून सामान्य नाहीतच. पण तरीही हे दोन चित्रपट कुठेतरी कायम स्मरणात राहतील. दुनियादारी, टाईमपास, टाईमपास २, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दगडी चाळ, अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, असे अनेक चांगले चित्रपट पहिले पण त्याविषयी लिहिलं  नाही काही पण मग "सैराट"च का?

सिनेमा पाहून तब्बल आठ दिवस उलटूनही तो इतक्या खोलवर का रुजलाय? का त्यातले पात्र, त्यातले संवाद, त्यातली गाणी, त्याचा पूर्वार्ध इतके आपले का वाटतात? का ती इतकी जवळची वाटते कि अक्ख्या महाराष्ट्राने हा सिनेमा इतका डोक्यावर का घ्यावा? ११ दिवसात ४१ कोटी!!!
२-३ वेळा पाहूनही लोकांचं समाधान होत नाहीये?
माझ्यापुरतं  बघायचं झालं  तर त्या चित्रपटाच्या पूर्वार्धात दाखवलेली गोष्ट इतकी खरी आहे आणि इतकी तंतोतंत जुळते आपल्या बालपणाशी, आपल्या पौगंडावस्थेतल्या प्रेमाशी, आपल्या शालेय वा कनिष्ठ महाविद्यालयातल्या दिवसांशी.

रेल्वेच्या आवाजावर नाचणं , नदीत पोहणं, शेतात भटकण, हे तर आहेच पण त्याही पलीकडे आपल्याला आवडणाऱ्या मुलीची एक झलक मिळवण्यासाठी वाटेल ते करायची तयारी, (मी सुद्धा मला आवडणाऱ्या मुलीला पाहण्यासाठी सकाळी लवकर उठून सायकल चालवायला जायचो न मग बराच वेळ त्याच त्याच रस्त्यावर परत परत सायकल आणणं असं  मी पण केलंय.) वर्गात जास्त मार्क्स पडणाऱ्या मुलाविषयी आपसूक वाटणारी उत्सुकता, मनातलं कळवण्यासाठी चिठ्ठीचा खुबीने केलेला वापर, मग त्या चिठ्ठीचं उत्तर येईपर्यंत मनाची होणारी घालमेल,  क्वचित प्रसंगी यशस्वी होणारं  प्रेम, न नाहीच झालं  तर हसत हसत  पचवलेला तो प्रेमभंग, जीवाला जीव देणारे मित्र, असं  सगळं आपण थोड्याफार फरकाने जगलेलो असतो.  

विशेष लक्षात राहतं  ते आर्ची हे पात्र… बिनधास्त, प्रामाणिक आणि मनापासून प्रेम करणारं. खरं  बोलणारं, डोळ्यातुन  बोलणारं. आर्ची आणि परश्या यांचं  प्रेम पण तितकच खरं  आणि त्या वयातलं  वाटतं,
कुठेही भपकेबाजपणा नाही, बॉलीवूडीकरण नाही.
उत्तरार्धाच्या सुरुवातीला प्रेमातूनच वास्तवाची करून दिलेली जाणीव, आणि त्यातून विशेषतः आर्चीची होणारी तडफड, प्रेम तर मिळालं  पण पण भुकेचं  काय?

सिनेमाच्या शेवटाविषयी मी काहीच बोलू शकत नाही.

पण तरीही लक्षात राहतो तो सिनेमाचा पूर्वार्ध, त्यातले संवाद, त्यातली भाषा, आणि लंगड्या बाळ्या सारखे मित्र, परश्या आणि आर्ची, त्यांचं  नातं, त्यांची धडपड, चोरून भेटणं, नकळत एकमेकांना हात लावणं, एकमेकांकडे बघणं, फोनवर बोलतांना जेवण्याचा आग्रह करणं, झाडावर बसणं, रंग खेळणं, सगळच आपलं असं  स्वतःच,
खोलवर रुतलेलं,……त्यांची ती भाषा, ते संवाद, अगदी आपले वाटतात..

आणि त्यावर सगळ्यात सुंदर असं उत्कट प्रेम जे प्रत्येकाने एकदा तरी केलेलं  असणारच.….              
सिनेमातून कोणी काय घ्यावं  हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला मात्र पुर्वार्धाने आयुष्यातील एका पोकळीची जाणीव करून दिली.

ज्यांना असं प्रेम लाभलं  असेल त्यांना खूप शुभेच्छा आणि ज्याचं एकतर्फी होतं त्यांना अतिविशेष शुभेच्छा.

वाद, चर्चा तर होणारच, पण सध्या "सैराट"च्या या सैराट यशाचा आनंद घेउ…

बाकी तुम्ही काळजी घ्या, हसत राहा आणि फिट राहा…