वैशाख महिन्यातील अशीच एक रणरणती दुपार ........हातात पेन घेऊन काहीतरी लिहावं हा माफक उद्देश..... असच विचार करता करता एका मुलाची गोष्ट आठवली....
त्या तरुण मुलाचे नाव होते "तो". हो, त्या मुलाचे नाव "तो" असेच आहे. कारण आजकालच्या भाषा संस्कृतीला शोभेसं असं कुठलही नाव त्याला दिलं तरी त्याचं नशीब आणि त्याची विचार करण्याची प्रवृत्ती काही बदलणार नाहीये. त्यामुळे त्याचे नाव "तो" असेच आहे.
"तो" हा एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील एकुलता एक मुलगा. आयुष्यभर नोकरीचं जोखड मानेवर घेऊन, महिन्याच्या पहिल्या तारखेला राजा ते महिन्याअखेरीस रंक असा प्रवास दरमहिना करण्याऱ्या सध्या भोळ्या आई वडिलांचा हा मुलगा. न कोणी भाऊ, न कोणी बहीण. त्यामुळे लहानपणापासूनच एकटेपणा पाचवीला पुजलेला. चांगल्या शाळेत आणि पर्यायाने चांगल्या महाविद्यालयातून इंजिनिअर होऊन बाहेर पडलेला "तो", एका जगप्रसिद्ध कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे.
हा झाला "तो" च्या सामाजिक आयुष्याचा लेखाजोगा; पण खरं तर तो खाजगी आयुष्यात बराच नाखूष होता. अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंगाचे ओझे, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांची जीवघेणी रस्सीखेच आणि आख्खं बालपण कुरतडलेल्या एकटेपणामुळे तरुण वयातच "तो" जरा जास्तच पोक्त झालेला होता. आणि ह्याच्याच जोडीला लहानपणापसून सतत इच्छा माराव्या लागल्यामुळे येन केन प्रकारेण श्रीमंत होण्याचा आसुरी हव्यास चित्त्यासारखा पाठलाग करत होता.
"तो" चं आयुष्य हे तसं पाहिलं तर अगदी सामान्य. आजकालच्या तमासगीर समाजाने त्याच्या आयुष्यात लक्ष घालावे असले काहीही नाही "तो" कडे. मग मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय? अं अं ........ पुढे वाचा.
एकदा अशीच एक मे महिन्यातल्या शुक्रवारची एक रणरणती दुपार..... अतिशय नयनरम्य असा नदीकाठचा परिसर...... एकच वडाचे झाड. ...... आणि झाडाखालच्या अमृततुल्य अशा थंडगार सावलीत "तो" अतिशय शांतपणे बसलेला. एकटक असा नदीकडे पाहत....अतिशय गार असा वारा वाहतोय.....................एक अनामिक अशी अस्वस्थता आणणारी गुंगी आहे त्या वाऱ्यात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की "तो" नदीकाठी काय करतोय म्हणून?
आदल्या रात्रीचं कामामुळे झालेलं जागरण, सकाळी घरातून निघतांना बाबांशी झालेला वाद, गाडीचे पंक्चर होणे आणि त्यामुळे साहेबांची खावी लागलेली बोलणी आणि ह्या सगळ्यामुळे झालेला मनस्ताप, असे सगळे सोपस्कार पार पडून तो त्या रम्य अशा नदीकाठावर येऊन बसलाय. नेहेमीप्रमाणे एकटाच..........
तसं नदीला बारमाही पाणी नसतं पण कसल्याशा धार्मिक सणानिमित्त धरणातून सोडलं होतं. खळखळ आवाज करत ते पाणी वाहत होतं. कशाचीही तमा न बाळगता एकसारखं वाहतच होतं ते पाणी........
त्या गार वाऱ्यात "तो" ला जरा गुंगी आल्यासारखा झालं. आणि मग सुरु झालं एक संवाद. ........... मनाचा मनाशी की नदीचा "तो"शी.,
नदी: काय "तो" काय चाललाय?
"तो": नेहेमीप्रमाणे एकटेपणातले चिंतन.
नदी: एकटा? कोण एकटा?तू आणि एकटा? इथे मी आहे की? मग?
"तो": तू होतीस, आहेस आणि असशील पण मी एकटा तो एकटाच न?
नदी: अरे "तो", मी असतांना तू एकटा का? मानशील त्या नात्याने मी तुझ्याशी वागू शकते.
रणरणत्या उन्हात गार पाण्याचा, मायेचा ओलावा देणारी आई होऊ शकते.
कशाचीही अपेक्षा न बाळगता सतत वाहत राहा असा वडिलकीचा उपदेश देणारे वडील होऊ शकते.
अंगावर पाण्याचे शिंतोडे उडवून त्रास देणारी छोटी बहीण होऊ शकते.
बोट धरून प्रवाहाबरोबर वाहवत नेऊन जगाचे दर्शन घडवून आणणारा मोठा भाऊ होऊ शकते.
एवढेच नाही तर सराईत तरुणी प्रमाणे जलक्रीडा करून अगदी तुमची बायको पण होऊ शकते.
"तो": बायको? हा हा हा ....... माझ्याप्रमाणे इतर वाटसरूही तुझे पाणी पितात, आपली पापं तुझ्या पाण्यात धुतात, मग मी तुझ्याकडे बायको म्हणून कसं काय पाहू? कारण बाकी सर्व नात्यांचा मी आधीच
अनुभव घेतला आहे.
आणि आपल्या समाजात हे कसे चालेल?
नदी: हा हा हा ...... अगदी रास्त आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलास ना? त्यामुळे तुझं असा विचार करणं अगदी रास्त आहे. मित्रा, तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका आईला कोणतही लहान मुल जड होत
नाही. घरी स्वयंपाक बनवला असता जर बाळाचे मित्र जेवायला आले तर आई काय त्यांना जेऊ घालणार नाही का? इथे प्रश्न हा नाहीये की तुझ्या माझ्या नात्याचं नाव काय? किंवा समाज आपल्या
नात्याकडे कश्या नजरेने बघतो? महत्त्वाचे हे आहे की आपल्या नात्यामुळे तू खुश आहेस का नाही? कारण कशाचीही तमा न बाळगता वाहत राहणं आणि इतरांना खुश करणं हेच माझं काम आहे. इतकच
नाही तर निरपेक्षपणे आणि कशातही किंवा कोणातही गुंतून न पडता मिळेल त्या रस्त्यावरून वाहत राहणं हेही माझंच काम. माझंच काय खरं तर तर प्रत्येकाचंच हे काम आहे.
"पाहिलं तर वाळवांटातही पाणी दिसते, आणि जर पहायचे नसेलच तर.......... मग प्रश्नच मिटला."
वाहत राहा मित्रा, तू फक्त वाहत राहा......... अगदी निरपेक्षपणे आणि जगण्याचा आनंद घेत.
आणि "तो" खडबडून जागा होतो. अर्धवट स्वप्नातून जागा झाल्या सारखा...
आणि समोरच नदीचे पाणी अतिशय आनंदात खळखळ करत वाहत असते...........
(क्रमशः)
आजकालच्या समाजात असे अनेक "तो" आहेत, जे अजूनही नैराश्येच्या गर्तेत अडकले आहेत.... सगळी सुख आहेत पण नेमका जे हवय तेच नाहीये. ही कथा त्या सर्व "तों" ना समर्पित.
तर कशी वाटली कथा मला नक्की कळवा. आणि तो पर्यंत मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत राहा.