नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
भर दुपारी गरम होत असतांना येणारी एक हलकीशी वाऱ्याची झुळूक, पहिल्या पावसाच्या आधी त्याच झुळूकेबरोबर येणारा मातीचा वास, ऐन थंडीत अंगावर काटे आणणारी बोचरी वाऱ्याची झुळूक,
अनेक अर्थ, अनेक भावना, अनेक आठवणी, अनेक प्रसंग, पण झुळूक तीच..... प्रत्येकाचा वेगळं असं नातं... त्या झुळूकेसोबत प्रत्येकाची एक अनामिक ओढ......
त्या झुळूकेला शब्दबद्ध केलंय एका कवितेच्या रुपात..... बघा आवडतिये का, आणि कोणाची किंवा कशाची आठवण येतीये का? मला नक्की कळ्वा. तोपर्यंत मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत रहा....
आणि तो गार वारा.....
वैशाखवणव्यात थंडावा देणारा
पहिल्या पावसात मातीचा सुगंध आणणारा,
हिवाळ्यात मात्र अंगावर काटे आणणारा
हाच तो गार वारा...!!
पानाफुलातून सळसळणारा,
छपरांवर चढून पाहणारा,
सुंदर सुगंध वाहून आणणारा,
हाच तो गार वारा...!!
बेधुंदपणे वाहणारा,
अभावितपणे घांगावणारा,
आपल्याच मस्तीत जगणारा,
हाच तो गार वारा...!!
हळूच मानेस स्पर्शून जाणारा,
आतून हवाहवासा वाटणारा
स्पर्शाचा अर्थ समजावून सांगणारा,
हाच तो गार वारा...
एकटेपणात सोबत करणारा,
मनाशी गुजगोष्टी करणारा,
आठवणीत नेऊन रमवणारा,
हाच तो गार वारा...!!
भावना उचंबळवून आणणारा,
मन भूतकाळात नेणारा,
गोड भविष्याची स्वपे दाखवणारा,
हाच तो गार वारा....!!
पण...
सिमेंटच्या जंगलात हरवणारा,
अस्तित्त्वासाठी दुसऱ्यावर विसंबणारा,
अगणित कचऱ्याचे ओझं वाहणारा,
हाच तो गार वारा...!!
No comments:
Post a Comment