Wednesday, 29 February 2012

तो.......


वैशाख महिन्यातील अशीच एक रणरणती दुपार ........हातात पेन घेऊन काहीतरी लिहावं हा माफक उद्देश..... असच विचार करता करता एका मुलाची गोष्ट आठवली.... 

त्या तरुण मुलाचे नाव होते "तो". हो, त्या मुलाचे नाव "तो" असेच आहे. कारण आजकालच्या भाषा संस्कृतीला शोभेसं असं कुठलही नाव त्याला दिलं तरी त्याचं नशीब आणि त्याची विचार करण्याची प्रवृत्ती काही बदलणार नाहीये. त्यामुळे त्याचे नाव "तो" असेच आहे.
"तो" हा एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील एकुलता एक मुलगा. आयुष्यभर नोकरीचं जोखड मानेवर घेऊन, महिन्याच्या पहिल्या तारखेला राजा ते महिन्याअखेरीस रंक असा प्रवास दरमहिना करण्याऱ्या सध्या भोळ्या आई वडिलांचा हा मुलगा. न कोणी भाऊ, न कोणी बहीण. त्यामुळे लहानपणापासूनच एकटेपणा पाचवीला पुजलेला. चांगल्या शाळेत आणि पर्यायाने चांगल्या महाविद्यालयातून इंजिनिअर होऊन बाहेर पडलेला "तो", एका जगप्रसिद्ध कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे.
हा झाला "तो" च्या सामाजिक आयुष्याचा लेखाजोगा; पण खरं तर तो खाजगी आयुष्यात बराच नाखूष होता. अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंगाचे ओझे, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांची जीवघेणी रस्सीखेच आणि आख्खं बालपण कुरतडलेल्या एकटेपणामुळे तरुण वयातच "तो" जरा जास्तच पोक्त झालेला होता. आणि ह्याच्याच जोडीला लहानपणापसून सतत इच्छा माराव्या लागल्यामुळे येन केन प्रकारेण श्रीमंत होण्याचा आसुरी हव्यास चित्त्यासारखा पाठलाग करत होता.
"तो" चं आयुष्य हे तसं पाहिलं तर अगदी सामान्य. आजकालच्या तमासगीर समाजाने त्याच्या आयुष्यात लक्ष घालावे असले काहीही नाही "तो" कडे. मग मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय? अं अं ........ पुढे वाचा. 

एकदा अशीच एक मे महिन्यातल्या शुक्रवारची एक रणरणती दुपार..... अतिशय नयनरम्य असा नदीकाठचा परिसर...... एकच वडाचे झाड. ...... आणि झाडाखालच्या अमृततुल्य अशा थंडगार सावलीत "तो" अतिशय शांतपणे बसलेला. एकटक असा नदीकडे पाहत....अतिशय गार असा वारा वाहतोय.....................एक अनामिक अशी अस्वस्थता आणणारी गुंगी आहे त्या वाऱ्यात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की "तो" नदीकाठी काय करतोय म्हणून?
आदल्या रात्रीचं कामामुळे झालेलं जागरण, सकाळी घरातून निघतांना बाबांशी झालेला वाद, गाडीचे पंक्चर होणे आणि त्यामुळे साहेबांची खावी लागलेली बोलणी आणि ह्या सगळ्यामुळे झालेला मनस्ताप, असे सगळे सोपस्कार पार पडून तो त्या रम्य अशा नदीकाठावर येऊन बसलाय. नेहेमीप्रमाणे एकटाच..........
तसं नदीला बारमाही पाणी नसतं पण कसल्याशा धार्मिक सणानिमित्त धरणातून सोडलं होतं. खळखळ आवाज करत ते पाणी वाहत होतं. कशाचीही तमा न बाळगता एकसारखं वाहतच होतं ते पाणी........
त्या गार वाऱ्यात "तो" ला जरा गुंगी आल्यासारखा झालं. आणि मग सुरु झालं एक संवाद. ........... मनाचा मनाशी की नदीचा "तो"शी.,

नदी: काय "तो" काय चाललाय?
"तो": नेहेमीप्रमाणे एकटेपणातले चिंतन.
नदी: एकटा? कोण एकटा?तू आणि एकटा? इथे मी आहे की? मग?
"तो": तू होतीस, आहेस आणि असशील पण मी एकटा तो एकटाच न?
नदी: अरे "तो", मी असतांना तू एकटा का? मानशील त्या नात्याने मी तुझ्याशी वागू शकते. 
        रणरणत्या उन्हात गार पाण्याचा, मायेचा ओलावा देणारी आई होऊ शकते.
         कशाचीही अपेक्षा न बाळगता सतत वाहत राहा असा वडिलकीचा उपदेश देणारे वडील होऊ शकते.
        अंगावर पाण्याचे शिंतोडे उडवून त्रास देणारी छोटी बहीण होऊ शकते. 
        बोट धरून प्रवाहाबरोबर वाहवत नेऊन जगाचे दर्शन घडवून आणणारा मोठा भाऊ होऊ शकते.
        एवढेच नाही तर सराईत तरुणी प्रमाणे जलक्रीडा करून अगदी तुमची बायको पण होऊ शकते.
"तो": बायको? हा हा हा ....... माझ्याप्रमाणे इतर वाटसरूही तुझे पाणी पितात, आपली पापं तुझ्या पाण्यात धुतात, मग मी तुझ्याकडे बायको म्हणून कसं काय पाहू? कारण बाकी सर्व नात्यांचा मी आधीच 
         अनुभव घेतला आहे. 
         आणि आपल्या  समाजात हे कसे चालेल?
नदी: हा हा हा ...... अगदी रास्त आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलास ना? त्यामुळे तुझं असा विचार करणं अगदी रास्त आहे. मित्रा, तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका आईला कोणतही लहान मुल जड होत      
        नाही. घरी स्वयंपाक बनवला असता जर बाळाचे मित्र जेवायला आले तर आई काय त्यांना जेऊ घालणार नाही का? इथे प्रश्न हा नाहीये की तुझ्या माझ्या नात्याचं नाव काय? किंवा समाज आपल्या 
        नात्याकडे कश्या नजरेने बघतो? महत्त्वाचे हे आहे की आपल्या नात्यामुळे तू खुश आहेस का नाही? कारण कशाचीही तमा न बाळगता वाहत राहणं आणि इतरांना खुश करणं हेच माझं काम आहे. इतकच 
        नाही तर निरपेक्षपणे आणि कशातही किंवा कोणातही गुंतून न पडता मिळेल त्या रस्त्यावरून वाहत राहणं हेही माझंच काम. माझंच काय खरं तर तर प्रत्येकाचंच हे काम आहे.
       "पाहिलं तर वाळवांटातही पाणी दिसते, आणि जर पहायचे नसेलच तर.......... मग प्रश्नच मिटला."
       वाहत राहा मित्रा, तू फक्त वाहत राहा......... अगदी निरपेक्षपणे आणि जगण्याचा आनंद घेत. 

आणि "तो" खडबडून जागा होतो. अर्धवट स्वप्नातून जागा झाल्या सारखा...
आणि समोरच नदीचे पाणी अतिशय आनंदात खळखळ करत वाहत असते...........

(क्रमशः)

आजकालच्या समाजात असे अनेक "तो" आहेत, जे अजूनही नैराश्येच्या गर्तेत अडकले आहेत.... सगळी सुख आहेत पण नेमका जे हवय तेच नाहीये. ही कथा त्या सर्व "तों" ना समर्पित. 

तर कशी वाटली कथा मला नक्की कळवा.  आणि तो पर्यंत मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत राहा.   

Wednesday, 1 February 2012

असं प्रेम करावं

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
मला कविता सुचते ती एखादा प्रसंग पाहून पण यंदा पहिल्यांदा सुचलीये ती एका व्यक्तीला पाहून. त्यामुळे ह्या कवितेचा संपूर्ण श्रेय त्या व्यक्तीला
सहजगत्या सुचली आणि कागदावर उतरवली
तुमच्यासमोर मांडली आणि तुम्हाला पसंत पडली किंवा नाही ते नक्की कळवा........

सगळं तुला देऊन सुद्धा 
माझी ओंजळ भरलेली
पाहिलंस तर तू तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली
...................... चंद्रशेखर गोखले

काळजी घ्या मजा करा आणि मला असेच भेटत रहा. 
  









एकदा प्रेम करावं
कसं करावं तर असं करावं,

लाजत करावं, मुरडत करावं,
इतरांना सांगून करावं,
आधी लपून करावं 
मग जाहीर पणे करावं
पण केल्यावर मात्र बेभान होऊन करावं,
  
रुसून करावं फुगून करावं
भांडून करावं रागावून करावं
समजून करावं समजवून करावं 
ऐकून करावं ऐकवून करावं
मनातलं बोलून करावं 
न बोललेलं ओळखून करावं

एकट्यात करावं ग्रुपमध्ये करावं
सगळ्यांना  सांभाळून करावं
सगळं सांभाळून करावं 
प्रत्येकाच्या मनाचा विचार करून करावं

कधीतरी लाडात येऊन करावं
जमल्यास लाडात येऊन बोलावं,
जर पुणेरी व्यक्ती असल्यास
"बर" इतकच ऐकून करावं 


आठवणीने प्रेम करावं
आठवण काढून प्रेम करावं
एकांतात भेटल्यावर मात्र 
न चुकता तेवढंच करावं 

पारंपारिक पद्धतीने करावं 
कधी नवीन कल्पनांनी करावं
व्यक्ती अरसिक असली तरी
त्या अरासिक्तेवर प्रेम करावं
व्यक्तीला स्वीकारून करावं
आपलंसं करून करावं

सर्व कमावून सुद्धा सगळं गमावून प्रेम करावं
आणि सर्वस्व गमावलं असल्यास काय कमावलं ते आठवून प्रेम करावं

सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे बेधुंद होऊन प्रेम करावं
टेकडीवरच्या खडकाप्रमाणे टणक होऊन प्रेम करावं
कापसाप्रमाणे मऊ होऊन प्रेम करावं
पानावरल्या दवबिंदू प्रमाणे क्षणभरात विरून जाऊन प्रेम करावं
   
पण कधी कधी हे प्रेम एकतर्फी पण करावं
मनात ठेवावं, हळूच दाखवावं
स्वतःला पाहिजे तेव्हा हळूच काढून 
आपलेआपण समजून करावं

पण एकदा तरी करावं 
कसं करावं 
तर ...... 
असं करावं

Tuesday, 31 January 2012

निर्व्याज प्रेम

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आणखी एक कविता आपल्यापुढे सविनय ठेवत आहे. वाचा आणि नक्की कळवा कशी वाटली ते.
तो पर्यंत काळजी घ्या, मजा करा आणि मला असेच भेटत राहा.   


दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
तुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हणाला 
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हणजे काय असतं
तर म्हणाला
प्रेम हे जगण्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायेस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायेस?
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने
परत निघालो
थोडा दूर गेलो असेल तोच
काडकन आवाज झाला
प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज
धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले
मरणाच्या दारात असुनही
तो हसत होता
मला म्हणाला
अरे मी तिच्यासोबत घालवलेला
हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता
 

Friday, 6 January 2012

मनःशांतीची चुणूक



नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मागील वर्षात तुम्ही खूप धमाल केली असेलच आणि ह्याही वर्षात करणार आहात. माझ्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा.

खर सांगायचं तर मी मागील कित्येक वर्ष "३१ डिसेंबर" अर्थात या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाचे स्वागत या हेतुपुरस्कृत काहीही करणं सोडून दिलंय. ह्याही वर्षी काही विशेष केलं नाही. अत्यंत सध्या पद्धतीने शेवट आणि सुरुवात केली. पण दुसऱ्या दिवशी अर्थात १ जानेवारी २०१२ ला रविवारची सुट्टी असल्या कारणाने कुठेतरी शांत आणि निर्मळ ठिकाणी जाऊन वर्षाची सुरुवात करायची असं असल्या कारणाने मी, केतन, गौरव आणि स्वप्नील सकाळचा चहा घेऊन बाहेर पडलो. आणि रस्ता पकडला तो पुणे-मुंबई महामार्ग.

पहिला तळ दिला  तळेगावच्या अलीकडे "शेलारवाडी किंवा बेगडेवाडी" लेण्यांच्या पायथ्याशी. आधी मस्त मिसळ-पावचा नाश्ता केला आणि चढायच का नाही यावर विचारविनिमय केला. मग एकदाचे चढायला लागलो. साधारण २०० पायऱ्या, दोन शंकराची मंदिर आणि काही ओस पडलेल्या गुहा इतकाच काय तो या लेण्यांचा घेर. मस्त फोटोग्राफी करून उतरून लगेच पुढच्या वाटेला लागलो. मग पोहोचलो ते तिकोणा किल्ल्याच्या अलीकडे "बेडसे लेण्यांच्या" पायथ्याशी. कामशेत मधून जेव्हा आपण "तिकोणा" किल्ल्याच्या रस्त्याला लागलो  की एके ठिकाणी डोक्यावरून "एक्स्प्रेस हायवेचा" पूल जातो. तो ओलांडला की उजवीकडे जायला एक फाटा लागतो तो तुम्हाला घेऊन जातो "बेडसे लेण्यांकडे". साधारण ४५० पायऱ्या चढून गेल्यावर एक शंकराचे मंदिर आणि काही गुहा लागतात. एक गुहेत एक मोठा स्तूप लागतो. आणि मग विविध कोरलेल्या मूर्तींचे भग्न अवशेष आणि अफाट कलाकुसर दिसते. खरच आपण नशीबवान आहोत हे असलं सगळं आंपण बघू शकतो अख्खं मंदिर डोंगरातून कोरलेलं आहे. तेव्हा जेव्हा काहीच साधन सामुग्री उपलब्ध नव्हती तेव्हा. मग तिथे मस्त फोटोस काढून एकदाचे उतरला आणि परत "बब्बी दा ढाबा" मध्ये सुग्रास भोजन करून परत पोहोचलो आपापल्या घरी.

अश्या रीतीने आमचा वर्षातला पहिला प्रवास पूर्ण झाला. मागील वर्षात अर्थात २०११ मध्ये आम्ही साधारण ९ ट्रेक्स. ५ फोटोग्राफी साठी भटकंती आणि १ पावसाळी सहल ती पण मुंबईच्या पावसात इतकी प्रदिर्घ भटकंती केलीये. ह्याही वर्षी करूच.

पण खरच वर्षाच्या शेवटला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी रमणीय अशा ठिकाणी जाताना गाडीवर किंवा तिथे पोहोचल्यावर मन जरा भूतकाळात गेलं. मागील वर्षातल्या घटना, त्यांचे पडसाद आणि आपण केलेली प्रगती किंवा अधोगती, आलेले यश किंवा अपयश, वैयक्तिक किंवा सामाजिक आयुष्यातले चढउतार, ह्या सगळ्यांचा विचार मनात डोकावला.
भारताने वर्ल्ड कप जिंकला, जपानमध्ये त्सुनामी आली, अण्णा हजारेंचे आंदोलन, वाढलेले दर आणि महागाई, दहशतवादाचा अधिकच बळावलेला आणि भयाण खतरा, वाढते प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंग, $ च्या तुलनेने रुपयाचे घसरत जाणारे दर. अश्या अनेक सामाजिक घटनांनी हे वर्ष गाजवलं. ह्या सगळ्यांचा अप्रत्यक्षपणे काहीतरी परिणाम नक्कीच झाला आपल्या सगळ्यांवर. माझ्यावरही झाला.
वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणायचं तर नोकरीत झालेला महत्त्वपूर्ण बदल, ताईच्या छ्त्रछायेमधून बाहेर पडून वसतिगृहात राहायला केलेली सुरुवात, बिघडलेली तब्येत अश्या अनेक घटना आहेत. मुग्धा,सुकृत, शीतल आणि रोहन यांसारखे मिळालेले मित्र मैत्रिणी, त्यांच्या सोबत घालवलेले मजेचे, आनंदाचे आणि मस्तीचे क्षण, केतनमुळे मिळालेले ट्रेकिंगचे क्षण, ताई आणि जीजुन्सोबत घालवलेले मस्त मस्त क्षण आणि आई बाबांचा धाक आणि प्रेम ह्यांची सावली. ऑफिस मध्ये स्वानंद आणि निखील यांची साथसंगत अश्या अनेक प्रसंगांनी गाजलं माझं मागील वर्ष. ह्या सगळ्यांना धन्यवाद देत नाही कारण औपचारिकता नकोत. एक महत्त्वाचा उल्लेख राहिला तो म्हणजे मावशी आणि मामे भावंडांचा. 

खर सांगू, लिहायचं म्हटलं ना तर वेळ आणि जागा कमी पडेल. पण एवढं सगळं आठवलं त्या भटकंतीत आणि एक विचार मनात आला, की पैसा, राजकारण, अण्णा हजारे, कोलावेरी डी, चिकनी चमेली, सचिनचे महाशतक, महागाई आणि दरवाढ, भ्रष्टाचार आणि काळा पैसा,   ह्या सगळ्यापलीकडे आपल्याला गरज असते ती मनःशांतीची. खरच आपले मन किती वेळ एक अथांग शांतता अनुभवत? अशी शांतता जिथे कोणीच नसतं, काहीच नसतं, असतो तो फक्त आपण स्वतः.!!! आठवून बघा बरं सापडतो का एखादा क्षण? आठवतील पण मोजकेच किंवा अजिबात नसतील. का असं का?
ह्याचंच उत्तर या वर्षी शोधण्याचा प्रयत्न करायचाय आपल्या सगळ्यांना,. प्रत्येकाचे मनःशांती मिळवण्याचे पर्याय वेगळेवेगळे असतील पण पर्यायांकडे नेणारी वाट आणि पर्यायांचे परिणाम मात्र एकच आहेत. मला मात्र अश्या शांत आणि निर्मळ ठिकाणी अशी मनःशांती मिळते. बघा तुम्हाला कुठे मिळते ते? शोधा ते पर्याय आणि त्या वाटेवर चालूनतर बघा. मग हे वर्ष कसे मस्त जाईल बघा. विचार नका करू जास्त. फक्त मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत राहा.                                                 

Tuesday, 20 December 2011

असेही एक पोटपाल......


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो
खूप कविता तारुण्य किंवा प्रेम अश्या सगळ्या आवडत्या विषयावर करून झाल्या. आता ठरवलं की एखादा सामाजिक विषय हाताळावा. आणि मी सध्याचा सगळ्यात ज्वलंत विषय निवडलाय. वाचताना ओघाने कळेलच काय आहे तो. 
मग नक्की वाचा आणि मला कळवा तुमचा अभिप्राय. तोपर्यंत मजा करा काळजी घ्या आणि मला असेच भेटत रहा.     



खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

पहाटेच्या स्वप्नांनंतर सकाळची चाहूल लागते 
दात घासण्या आधीच जिभेला चहाची चटक लागते.
चहासोबत बिस्कीट असावेच लागते 
तीन हक्काचे आणि तिनं आग्रहाचे असे सोपे गणित असते.

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

स्वीकारचे पोहे की काटाकीरची मिसळ, नक्की ठरत नसते
पण रोज कोण्या एकाची बोहनी करायची असते 
मध्येच एक दिवस वैशालीचा डोसा दिसू लागतो
एकाने पोट भरत नाही आणि तवाही गरमच असतो.

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

दुपारचे जेवण नीट जेवायचे असते
पंचपक्वान्न नसले तरी साग्रसंगीत तरी असावेच लागते
घरचे वा डब्यातले, ऑफिसमधले वा हॉटेलचे, जेवण मात्र असेच असते
कुठेही बसून खाल्ले तरी पोटात हेच रीच्वायचे असते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!


संध्याकाळी भेटीची वेळ ठरलेली असते
अशा भेटीत पाणीपुरीची रंगत न्यारीच असते
दोघात एक घेऊ असे मग ठरते 
त्यालाच कळते जे कोण मग शेवटी बील भरते!!

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

रात्री घरी जेवतांना घरच्या अन्नाची महती कळते 
वाढतं वय नावाखाली एक पोळी जास्तीची पानात पडते
भाताशिवाय आमचे पान हलत नसते
दही का वरण इतकेच नेमके ठरवायचे असते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

जेवण झाल्यावर आईस क्रीम काय लागते म्हणून सांगावे
आईस क्रीम खाल्यामुळे आम्लपित्त होत नाही असे रोज म्हणावे
"कसलं सुंदर होतं ते फ्लेवर" नेमके कोणीतरी वदावे
आलोय न आज मग खाऊनच बघावे

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

वर्षभर सणांची रेलचेलच असते
प्रत्येक सणाला मात्र गोडाधोडाची मांदियाळीच असते
कितीही मोठा झालास तरी पौष्टिक लाडूची प्रत्येकाला गरज असते
डिंकाचे कि खारीक-खोबऱ्याचे आईला परफेक्ट ठाऊक असते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

श्वास ओढून पोट आत दाबता येत असते
बेल्ट लाऊन विजारीत खुपस्ताही येत असते
अशाही परिस्थितीत कोणीतरी आपल्या दिशेला बघून हसत असते 
फक्त आपल्याला हसत असते की आपल्याकडे बघून हे मात्र कधीच कळत नसते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

व्यायाम शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठीला रग लागते
उद्या नक्की करू म्हणून आज वेळ निघून जात असते
आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्यासाठी नसतेच 
असे कायम मन मारून हसरे तोंड आजूबाजूला बघत असते

खरच आपल्या अंगात किती चरबी असते 
इतरांना दिसत असली तरी आपल्याला मात्र कधीच दिसत नसते!!

Saturday, 10 December 2011

मनातलं द्वंद्व


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो
कवितेच्या रुपातलं हे माझं १२ व रत्न. मनावर सगळ्यात जास्त राज्य करतात त्या आठवणी मग त्या चांगल्या असोत वा वाईट. त्या आठवणी आणि त्यांच्याशी निगडीत भावनांवर लिहिलेली ही कविता
जरा जड जाऊ शकते समजायला पण नीट वाचली तर नक्की कळेल आणि पटेलही. बघा कळतिये का आणि कळल्यावर पटतिये का?

मला नक्की कळ्वा तुमचा अभिप्राय आणि तो पर्यंत मजा करा काळजी घ्या आणि मला असेच भेटत राहा.   





एकट्या तृषार्त मनाला,
सहवासाची तहान लागते 
आठवणींच्या मृगजळाला ते 
पाणी समजू लागते!!

कितीही मागे पळाले तरी
ते मात्र दूरच पळते,
कितीही पकडायचे म्हटले 
तरी आपले बळ कमीच पडते!!

कालांतराने मात्र मृगजळाचे चक्रव्यूह होते
अधिकच गुंतून पडल्याने 
मन अभीमन्युसारखे वागते!!!

बाहेर पडण्याच्या व्यर्थ झटापटीत
अधिकच गुंतून पडते 
जणू स्वतःच्या विणलेल्या जाळ्यात 
स्वतःच रुतून बसते!!

त्या जाळ्याशी झगडत असताना
एक मात्र सपशेल विसरते 
कि प्रत्यक्षात ते जाळे मात्र
दुसऱ्यानेच विणलेले असते!!

झगडता झगडता जाळे विणण्यात निष्णात
अश्या कोळ्याचे किटकात रुपांतर होते
आणि कोठूनच वाट सापडत नाही म्हणून
आहे तिथेच फतकल मारून बसते

पण एक मात्र नक्कीच असते 
आयुष्य मात्र आठवणीन्च्याच रुपात मनावर ठसते 
चांगल्या असो व वाईट
मन त्यांचेच रवंथ करत बसते

आठवणींचे प्रत्येक जाळे 
 एक अनुभव होऊन बसते
चांगले ते पटकन विसरून 
वाईट तेवढं दीर्घकाळ स्मरणात राहते

तरी मन पुन्हा पुन्हा आठवते 
कारण प्रत्येक आठवण 
एकतर आशीर्वाद ठरते
नाहीतर आयुष्यभर आठवेल असा धडा बनते!!!


Saturday, 19 November 2011

तुझं असणं......


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येतात, नातेवाईक येतात, त्यांच्या येण्याने किंवा नुसतं असण्याने आपलं आधीचे आयुष्य पार बदलून जाते. आणि आपल्याला त्याची प्रचीती वेळोवेळी येत असते. अश्या सर्व व्यक्तींना हि कविता अर्पण. तुम्ही पण तुमच्या अश्या कुठल्या व्यक्तींना ही कविता ऐकवा न मला कळवा कशी वाटली ते. तो पर्यंत काळजी घ्या मजा करा आणि मला असेच भेटत राहा.  
 माझं येणं म्हणजे अकाली पावसाचं येणं
आणि तुझं येणं म्हणजे पावसानंतर इंद्रधनुष्य प्रकटण!

माझं असणं म्हणजे डबक्यात पाणी साठणं
आणि तुझं असणं म्हणजे त्याच पाण्यात कमळ उमलण!

माझं असणं म्हणजे रानात गवताचं उगवणं
आणि तुझं असणं म्हणजे त्याच गवतावर दवबिंदू पडणं!!

माझं असणं म्हणजे चार भिंतींचा गाभारा बांधणं
आणि तुझं असणं म्हणजे त्या गाभाऱ्यात मूर्तीमंत पावित्र्य आणणं!!

माझं असणं म्हणजे नुसताच पोकळ पावा असणं
आणि तुझं असणं म्हणजे त्या पाव्यातुन सप्त सूर उमटण!!

माझं असणं म्हणजे लोखंड होऊन जाळण
पण तुझं असणं म्हणजे परीस स्पर्शाने त्या लोखंडाच सोनं होणं!!

माझं असणं म्हणजे नुसता कापसाचा आणि तेलाचा दिवा असणं
आणि तुझं असणं म्हणजे तीमिरातुनी तेजाकडे नेणारा प्रकाश बनणं

माझं असणं म्हणजे फक्त हाडा-मांसाच शरीर असणं
आणि तुझं असणं म्हणजे एक अंतरात्मा होऊन त्या शरीरात वास करणं.