Thursday, 12 May 2016

सैराट…. का?

आज खरच खूप दिवसांनी लिहायला घेतलं… अगदी मोजायचं म्हटलं तर तब्बल तीन वर्षांनी. काही विशेष असं कारण नाही पण कशावर तरी लिहावं  असा खरच आतून वाटलं नाही. व्यक्त व्हावं  असं  वाटलं  नाही.
मागच्या आठवड्यात शुक्रवारी (६ मे २०१६) रोजी "सैराट.." नावाचा चित्रपट पहिला.
नागराज मंजुळे लिखित आणि दिग्दर्शित, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू अभिनित, "सैराट…" आणि त्याला अजय-अतुल यांचं  कमाल संगीत…. हा चित्रपट पहिल्यानंतर मनात काहीतरी खदखदतय… काहीतरी वरचेवर मनात येतंय…. म्हटलं  आज कागदावर उतरवावेत हे विचार…

तसं गेल्या सहा महिन्यात "कट्यार काळजात घुसली (२०१५)" आणि "नटसम्राट (२०१६)" हे दोन अप्रतिम चित्रपट सुद्धा आले आणि सुपरहिट झाले. पण त्या चित्रपटाशी असं  आतून connect  नाही होता आलं. कट्यार हा एका संगीत नाटकावर बेतलेला किंबहुना संगीतप्रधान चित्रपट. कानाला निरातिशय सुख देणारा चित्रपट… भव्य सेट आणि तगड्या कलाकारांची फौज…. पण एक सामान्य माणूस म्हणून तो चित्रपट आतवर असा खोलवर रुजत नाही.
तशीच काहीशी  गत "नटसम्राट" ची. "नाना पाटेकरांचा" अत्त्युच्च अभिनय आणि एकूणच "वी वा शिरवाडकर सरांचं" लेखन हे अद्भुत combination जुळून आलेलं पण तरीही एक सामान्य माणूस म्हणून मी त्या चित्रपटाशी आतून नाही connect होऊ शकत. ती गोष्ट मला माझी नाही वाटत. एका मोठ्या अभिनेत्याचं पडद्यामागचं  आयुष्य जरी सामान्य माणसासारखं असलं तरीही ते व्यक्ती म्हणून सामान्य नाहीतच. पण तरीही हे दोन चित्रपट कुठेतरी कायम स्मरणात राहतील. दुनियादारी, टाईमपास, टाईमपास २, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दगडी चाळ, अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, असे अनेक चांगले चित्रपट पहिले पण त्याविषयी लिहिलं  नाही काही पण मग "सैराट"च का?

सिनेमा पाहून तब्बल आठ दिवस उलटूनही तो इतक्या खोलवर का रुजलाय? का त्यातले पात्र, त्यातले संवाद, त्यातली गाणी, त्याचा पूर्वार्ध इतके आपले का वाटतात? का ती इतकी जवळची वाटते कि अक्ख्या महाराष्ट्राने हा सिनेमा इतका डोक्यावर का घ्यावा? ११ दिवसात ४१ कोटी!!!
२-३ वेळा पाहूनही लोकांचं समाधान होत नाहीये?
माझ्यापुरतं  बघायचं झालं  तर त्या चित्रपटाच्या पूर्वार्धात दाखवलेली गोष्ट इतकी खरी आहे आणि इतकी तंतोतंत जुळते आपल्या बालपणाशी, आपल्या पौगंडावस्थेतल्या प्रेमाशी, आपल्या शालेय वा कनिष्ठ महाविद्यालयातल्या दिवसांशी.

रेल्वेच्या आवाजावर नाचणं , नदीत पोहणं, शेतात भटकण, हे तर आहेच पण त्याही पलीकडे आपल्याला आवडणाऱ्या मुलीची एक झलक मिळवण्यासाठी वाटेल ते करायची तयारी, (मी सुद्धा मला आवडणाऱ्या मुलीला पाहण्यासाठी सकाळी लवकर उठून सायकल चालवायला जायचो न मग बराच वेळ त्याच त्याच रस्त्यावर परत परत सायकल आणणं असं  मी पण केलंय.) वर्गात जास्त मार्क्स पडणाऱ्या मुलाविषयी आपसूक वाटणारी उत्सुकता, मनातलं कळवण्यासाठी चिठ्ठीचा खुबीने केलेला वापर, मग त्या चिठ्ठीचं उत्तर येईपर्यंत मनाची होणारी घालमेल,  क्वचित प्रसंगी यशस्वी होणारं  प्रेम, न नाहीच झालं  तर हसत हसत  पचवलेला तो प्रेमभंग, जीवाला जीव देणारे मित्र, असं  सगळं आपण थोड्याफार फरकाने जगलेलो असतो.  

विशेष लक्षात राहतं  ते आर्ची हे पात्र… बिनधास्त, प्रामाणिक आणि मनापासून प्रेम करणारं. खरं  बोलणारं, डोळ्यातुन  बोलणारं. आर्ची आणि परश्या यांचं  प्रेम पण तितकच खरं  आणि त्या वयातलं  वाटतं,
कुठेही भपकेबाजपणा नाही, बॉलीवूडीकरण नाही.
उत्तरार्धाच्या सुरुवातीला प्रेमातूनच वास्तवाची करून दिलेली जाणीव, आणि त्यातून विशेषतः आर्चीची होणारी तडफड, प्रेम तर मिळालं  पण पण भुकेचं  काय?

सिनेमाच्या शेवटाविषयी मी काहीच बोलू शकत नाही.

पण तरीही लक्षात राहतो तो सिनेमाचा पूर्वार्ध, त्यातले संवाद, त्यातली भाषा, आणि लंगड्या बाळ्या सारखे मित्र, परश्या आणि आर्ची, त्यांचं  नातं, त्यांची धडपड, चोरून भेटणं, नकळत एकमेकांना हात लावणं, एकमेकांकडे बघणं, फोनवर बोलतांना जेवण्याचा आग्रह करणं, झाडावर बसणं, रंग खेळणं, सगळच आपलं असं  स्वतःच,
खोलवर रुतलेलं,……त्यांची ती भाषा, ते संवाद, अगदी आपले वाटतात..

आणि त्यावर सगळ्यात सुंदर असं उत्कट प्रेम जे प्रत्येकाने एकदा तरी केलेलं  असणारच.….              
सिनेमातून कोणी काय घ्यावं  हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला मात्र पुर्वार्धाने आयुष्यातील एका पोकळीची जाणीव करून दिली.

ज्यांना असं प्रेम लाभलं  असेल त्यांना खूप शुभेच्छा आणि ज्याचं एकतर्फी होतं त्यांना अतिविशेष शुभेच्छा.

वाद, चर्चा तर होणारच, पण सध्या "सैराट"च्या या सैराट यशाचा आनंद घेउ…

बाकी तुम्ही काळजी घ्या, हसत राहा आणि फिट राहा…  



              

Tuesday, 22 January 2013

बाप...

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

मुलाशी मात्र त्यांचं मित्रात्त्वाचं नातं असता!
आजकालच्या जगात अगदी फेसबुकवर अकाउंट देखील असतं 
महिन्याच्या शेवटला फक्त बेरजा वाजबाक्यांचच गणित असतं 
पण मुलाची इच्छा पुरवायला पाकीट सदैव मोकळंच असतं!!

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

मुलीशी असलेलं नातं शब्दातीत नसतं
तिचं सगळं चांगलं व्हावं एवढंच मनात असतं 
कधी कधी ते जरा कडक शिस्तीचंही असतं!!
मुलगी सासरी जातांना सगळ्यात जास्त पाणी त्यांच्याच डोळ्यात असतं!!

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

आयुष्य मात्र त्यांचं खूप कष्टाचं असतं 
एकाच वेळी तीन पिढ्यांच्या जबाबदारीचा असतं 
कधी शिणलेलं, कधी थकलेलं , कधी मुद्दाम केलेल्या ओव्हर टाईमचं असतं
कारण स्वतःपेक्षा कुटुंबाचं सुख त्यांच्या खर्चाच्या गणितात बसतं!!!

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

फक्त जबाबदारी उचुलूनच शरीर थकतं
सदांकदा दुस्र्यांचाच विचार हे ब्रीद वाक्य असतं 
बदल्यात एखाद्या प्रेमाच्या शब्दाची अपेक्षा फक्तं 
पाय चेपून घेतांना सुद्धा मुलाचं हात दुखेल हेच दिसतं 

मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र वेगळच असतं!!

आपलं मन पण किती वेडं असतं 
बाप नावाच्या मित्राला उगा घाबरत असतं 
त्याने घेऊन दिलेल्या वस्तूंच्या रुपातच त्याची किंमत करतं 
दूर राहिल्यावरच मात्र त्यांचं  खरं अस्तित्व कळतं 

कारण...
मनात मात्र त्यांच्या खूप प्रेम असतं! 
बाबांचं गणित मात्र जरा वेगळच असतं!!

Tuesday, 8 January 2013

It's all about priorities.....

जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं 
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

लहानपणी सारंच निराळं असतं 
शाळा हेच आपलं जग असतं 
वाटावाटी करून खाणं आद्य कर्तव्य असतं 
मनात एक आणि तोंडात दुसरं असं काही नसतं 
निरागसता हे मैत्रीचं पाहिलं वैशिष्ट्य असतं 
शिक्षा आणि गाभुळलेल्या चिंचांचे झाड एकत्रच उपभोगलेलं असतं!!!

तरीपण.......
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

शाळेनंतर कॉलेज एक अद्भूत जग असतं 
नाविन्याची कास धरून नवतारुण्य अवतरलेलं  असतं 
नवीन भावना आणि नवीन ओळखी यांचं वेगळंच नातं असतं 
नवीन विश्व फारच मजेशीर आणि आकर्षक असतं 
नाविन्याच्या ओघात जुनं  ते मागे पडलेलं  असतं 
जुनं  तेच सोनं  असते आणि नवीन ते मृगजळ असते हे काही कळालेलं नसतं  
मैत्रीचं अद्भुतरम्य जग घरच्यांपेक्षाही जवळचं बनलेलं असतं 

तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

शिक्षण संपल्यानंतर निराळच वाढून ठेवलेलं असतं 
करियर नावाचं जोखड मानेवर लादलेलं असतं 
स्वतःचं  तेवढं पहावं  इतकं  संकुचित ते जग असतं 
नाविन्यातले सगळं अधिकच दूर गेलेलं भासतं  
जुने ते मागेच सरलेलं असतं 
सोबतीची खरी गरज आहे हे खूप उशीरा कळतं 
इगो नावाच्या विकाराने मन अधिकच ग्रासतं!!!

तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

आपल्यासाठी फार थोड्या जणांचं हृदय जळत असतं 
जनरेशनच्या  फरकामुळे आधीच त्यांना मागे  टाकलेलं असतं 
आपलं  मन मात्र त्यांना सोडून भलत्याच्याच पाठीमागे भरकटत असतं 
आपल्याला फक्त ह्याचंच वाईट वाटत असतं 
की आपल्यावाचून त्यांचं काहीच अडत नसतं 
तरी त्यांच्यासाठी मन मात्र तीळ तीळ  तुटत असतं 
ह्यातूनच खोलवर मन निराशेच्या गर्तेत रुतत असतं 
It's all about priorities असं म्हणणं सोपं असतं!!!!

तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

ह्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहित  नसतं 
ज्यांना माहित असतं त्यांचा आपल्याला ऐकायचं  नसतं   
आपल्याला आपलंच दुःख कुरवाळत बसायचं असतं 

तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

पण शेवटी ह्या सगळ्याच्या पलीकडे पोहोचतो आपण
कारण लक्षात राहते ती फक्त आठवण 
 नक्की भेटायचे वायदे करतो जोपण 
दरवेळी पुढे करतो कारण 
ती वेळ काही कधी येताच नाही 

कारण 
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं 
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!

Thursday, 24 May 2012

हाच तो गार वारा...

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
भर दुपारी गरम होत असतांना येणारी एक हलकीशी वाऱ्याची झुळूक, पहिल्या पावसाच्या आधी त्याच झुळूकेबरोबर येणारा मातीचा वास, ऐन थंडीत अंगावर काटे आणणारी बोचरी वाऱ्याची झुळूक,
अनेक अर्थ, अनेक भावना, अनेक आठवणी, अनेक प्रसंग, पण झुळूक तीच..... प्रत्येकाचा वेगळं असं नातं... त्या झुळूकेसोबत प्रत्येकाची एक अनामिक ओढ......
त्या झुळूकेला शब्दबद्ध केलंय एका कवितेच्या रुपात..... बघा आवडतिये का, आणि कोणाची किंवा कशाची आठवण येतीये का? मला नक्की कळ्वा. तोपर्यंत मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत रहा....

आणि तो गार वारा.....
वैशाखवणव्यात थंडावा देणारा
पहिल्या पावसात मातीचा सुगंध आणणारा,
हिवाळ्यात मात्र अंगावर काटे आणणारा
हाच तो गार वारा...!!

पानाफुलातून सळसळणारा,
छपरांवर चढून पाहणारा,
सुंदर सुगंध वाहून आणणारा,
हाच तो गार वारा...!!

बेधुंदपणे वाहणारा,
अभावितपणे घांगावणारा,
आपल्याच मस्तीत जगणारा,
हाच तो गार वारा...!!

हळूच मानेस स्पर्शून जाणारा,
आतून हवाहवासा वाटणारा
स्पर्शाचा अर्थ समजावून सांगणारा,
हाच तो गार वारा...

एकटेपणात सोबत करणारा,
मनाशी गुजगोष्टी करणारा,
आठवणीत नेऊन रमवणारा,
हाच तो गार वारा...!!

भावना उचंबळवून आणणारा,
मन भूतकाळात नेणारा,
गोड भविष्याची स्वपे दाखवणारा,
हाच तो गार वारा....!!



पण...

सिमेंटच्या जंगलात हरवणारा,
अस्तित्त्वासाठी दुसऱ्यावर विसंबणारा,
अगणित कचऱ्याचे ओझं वाहणारा,
हाच तो गार वारा...!!









Thursday, 1 March 2012

"तो"च्या आयुष्यातील वल्ली..... देशमुख काका.





नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
दिनांक ११ मे २०११ रोजी २० :४६ वाजता मी माझ्या आयुष्यातली पहिली कथा लिहून पूर्ण केली होती. कथेला नेहेमी प्रमाणे नायक होता..... नायिका पण होती. ती कथा माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये देत आहे. आज रोजी दुसरा अंक म्हणण्यापेक्षा दुसरी कथाच म्हणूया, लिहित आहे. ही वाचून झाल्यावर ती आधीची पण वाचा आणि मला कळवा कशी वाटली ते...........  तो पर्यंत मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत रहा.

साधारण पणे दुपारची वेळ........ चार साडेचार ची. उतरतं उन आणि झोंबणारा गरम वारा......आज "तो" ला ऑफिस ला जायचा मूड नव्हता. तो आपला उगाचच फॉर्मल कपड्यांमध्ये इतस्ततः भटकत होता. नेहेमीच्या सातच्या कात्कैन्पासून दूर जात होता अर्थात त्त्यांच्यापासून पळत होता......... एका आवाजाच्या शोधात..... तो कोणाचा आवाज होता? "तो" च्या आंतर्मनाचा कि आणखी कोणाचा ते काही कळायला मार्ग नव्हता. पण शोध मोहीम जोरात चालली होती...... कुठेतरी चाललेली भावनिक घुसमट, स्पर्धेचं  ओझं....... (इथे जगण्याची स्पर्धा आहे बरका) आणि शारीरिक दमछाक ह्या जाचातून बाहेर पडून त्याला एकांत हवा होता.... त्याच्या शोधात होता "तो". 

एका दुकानाबाहेर सहज पणे उभा होता तो......तितक्यात कुठून तरी एका जुन्या पद्धतीच्या सायकलवर एका गोड मुलाला पुढे बसवून एक आदमासे ६४-६५ वर्षांचे आजोबा त्या दुकानात आले.....त्यांचे नाव देशमुख होते हे मला त्या दुकानदाराने सांगितले.  त्यांनी एक मस्त जीन्स आणि टी-शर्ट घातला होता..... स्वच्छ आणि कडक इस्त्री केलेला......... आणि तो मुलगा ज्याचा नाव "अनिकेत" होता असा नंतर मला कळलं ......  तो ४ वर्षांचा होता....... बोबडे बोल बोलत होता......
ते वस्तू घेऊन बाहेर आले..... त्यांची आणि माझी नजरा नजर झाली.... अगदी सहजपणे त्यांनी माझ्याकडे पाहून एक अनौपचारिक स्माईल दिली.  आणि मला कळलेच नाही किई कुठून संवादाला सुरुवात झाली.
माझा चेहेरा पाहूनच त्यांनी सगळा ओळखलं. त्यांच्या वयात आता काही सांगायची गरज नसतेच, अनुभवाची शिदोरी इतकी मोठी असते की नुसत्या नजरेनेच सगळा ओळखता येत...... मला म्हणाले चाल जरा चालुयात.... ह्या रस्त्याने....... अनिकेतला पुढे बसवून एका हाताने सायकल लोटत आणि दुसरा हात माझ्या खांद्यावर ठेवून ते निघाले.... आम्ही चालायला लागलो......


"कधी कधी कहा नातं असावच लागतं असं नाही वाटत मला......... अशी सुरुवात केली आणि ते बोलत राहिले आणि तो ऐकत गेला......... फक्त ऐकत गेला............ कारण "तो" ची वाचा एक अज्ञात शक्तीने नियंत्रणात   ठेवावी तशी बंद झालेली........
ते म्हणत होते,
"तुला थोडासा अवघड वाटत असेल न मी असं अचानक तुझ्यावर हक्क दाखवणं......आणि माझे अशे ती तिची.आधुनिक कपडे आणि जुनाट सायकल.......... हे कॉम्बिनेशनच मुळात खूप विचित्र वाटत असेल तुला.
मित्रा, मित्रा म्हणू न तुला मी? नाही आपल्या वयात अर्थात शारीरिक वयात कदाचित बरच अंतर असेल पण मानसिक किंबहुना बोद्धिक वयात फारसं अंतर नसेल...... कारण बुद्धीचं वय कधीच वाढत नाही......
असो. माझ्या पहिल्या कमाईतून मी ही सायकल घेतली होती १९६७-६८ च्या सुमारास. तेव्हा ३० पैसे किंमत होती तिची. अगदी साधी पण मजबूत आणि दणकट. पहिल्यांदा टांग टाकली आणि प्रेमातच पडलो तिच्या ते आजतागायत मी तिच्यावर आकंठ प्रेम करतो. माझ्या आयुष्यातली पहिली माझी सोबतीण आणि पाहिलं स्त्रीलिंगी व्यक्तिमत्त्व........ मला आई नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा हिच्यावर प्रेम जडलं.
माझे बाबा तेव्हा एका गिरणीत कामगार होते कनिष्ट श्रेणीतले. त्यामुळे सायकल घेण्याची चैन कधी केलीच नाही. मग कालांतराने शिक्षण, लग्न, नोकरी, आणि मग वयाच्या ३७ व्या वर्षी फक्त बायकोचा पाठींबा आणि खिशातले कसल्याश्या फंडाचे १४,००० रुपये यावर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. गाठीशी तब्बल १७ वर्षांचा नोकरीचा अनुभव. मग जोमात कामाला सुरुवात केली...... आणि एक प्रथितयश बिस्नेस्मन झालो. आज स्वतःचा बंगला, ४ गाड्या आणि स्वतःची आवड म्हणून घेतलेली एक मर्सिडीज बेंझ गाडी..... हाताशी नोकर चाकर.... परदेशात स्थायिक झालेली आणि आत्ता सुट्टीत भारतात आलेली दोन्ही अतिशय कर्तृत्ववान मुलं.. त्यांचं सगळं समाधानाने पाहून मागल्याच वर्षी आयुष्याच्या पटावरचा डाव अर्ध्यात टाकून मला सोडून गेलेली माझी सुलभा..... फक्त कुठल्याश्या तापाचा निमित्त झालं आणि गेली ती गेलीच. 
हे सगळं सांगण्याचा उद्देश मोठेपणाची फुशारकी मारण्याचा नव्हता... काय मिळवायचं राहिलं का या आयुष्यात... सगळं मिळालं..... मान-सन्मान, सुख-दुःख, अगदी जीव तोडून जगलो हे आयुष्य. पण मी आज हे तुला का सांगू शकतोय माहितीये,
कारण मी प्रत्येक क्षण जगलोय अगदी १०० टक्के. जसा आला तसा, त्या क्षणाला आपला समजून जगलोय. मला जे करायचं होतं ते केलं.. मला अतिशय छोट्या गोष्टीत आनंद शोधायला आवडतो. माझी ही सायकल चालवणे, स्वतःचा स्वयंपाक करणे, पुस्तके वाचणे, बाग काम करणे आणि मी एका वृद्धाश्रमाचा कर्मचारी पण आहे. सगळ्यांना एकत्र जमवून जाम धमाल करतो मी. मला माहित आहे हा क्षण एकदा निसटला कि परत येणार नाही, कधी कुठल्या गाडीवर, गोळीवर, बॉम्बवर, रोगावर, आपला बुलावा लिहिला असेल. माहित नाही ना?..... मग आजचा हा आत्ताचा क्षण का वाया घालवता? जगा जीव तोडून जगा.... हसून, रडून, आनंदून, दुःखात बुडून किंवा तटस्थपणाने जगा, पण जगा, त्या क्षणाला पूर्ण न्याय द्या. तो फक्त आपला आहे या जगात बाकी काही नाही. सगळं काही आपल्या मनासारखं मिळत नसतं आपल्याला. पण ते मिळालंय ना मग नावडतं का असेना पण  त्या क्षणाला त्या क्षणाचे नावडते पण जगा. नोकरी आवडत नाही.... मग बदल नसेल शक्य तर आवडते आहे असे समजून जगा.... तसं जमत नसेल तर थोडा वेळ द्या. आपण कायम आनंद मोठ्या गोष्टीत शोधायला जातो आणि दुःख छोट्या गोष्टीत. ह्याच्या पूर्णपणे उलटं जगून बघा बरं एकदा. बघा कसे दिवस पालटतील तुमचे...... जमेल मित्रा तुला.  मला माझ्या व्यवसायाच्या पहिल्याच वर्षी ४५०००० चं नुकसान झालेलं. तरी मी त्यातून सावरलो. एक सूत्र मनात ठेव. हा क्षण आपला आहे. तो जगुयात अगदी शेवटचा असल्यासारखा. बघ तुला तुझ्या वयाच्या ६० वर्षी माझ्यासारखेच उत्तर देता येते का नाही ते. 


आणि मुळात आपलं आयुष्य खूपच कमी असता. का ते दुःख मोजण्यात घालवायचं? जगुयात ना मस्त. आत्ता ह्याक्षणी कसं तू मन लावून माझं ऐकलंस आणि ह्या क्षणाचा विजय झाला. असाच मोठा हो मित्रा."


असे म्हणून त्यांनी "तो"च्या पाठीवर अशी काही जोरात थाप मारली आणि सायकलची टांग मारून क्षणार्धात नाहीसे झाले "तो"च्या पुढ्यातून..... "तो"ला असंच विचारात पडून......... आणि तो फक्त स्मित हस्त वादनाने त्यांच्या वाटेकडे पाहत राहीला.                        



    
   


          



Wednesday, 29 February 2012

तो.......


वैशाख महिन्यातील अशीच एक रणरणती दुपार ........हातात पेन घेऊन काहीतरी लिहावं हा माफक उद्देश..... असच विचार करता करता एका मुलाची गोष्ट आठवली.... 

त्या तरुण मुलाचे नाव होते "तो". हो, त्या मुलाचे नाव "तो" असेच आहे. कारण आजकालच्या भाषा संस्कृतीला शोभेसं असं कुठलही नाव त्याला दिलं तरी त्याचं नशीब आणि त्याची विचार करण्याची प्रवृत्ती काही बदलणार नाहीये. त्यामुळे त्याचे नाव "तो" असेच आहे.
"तो" हा एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील एकुलता एक मुलगा. आयुष्यभर नोकरीचं जोखड मानेवर घेऊन, महिन्याच्या पहिल्या तारखेला राजा ते महिन्याअखेरीस रंक असा प्रवास दरमहिना करण्याऱ्या सध्या भोळ्या आई वडिलांचा हा मुलगा. न कोणी भाऊ, न कोणी बहीण. त्यामुळे लहानपणापासूनच एकटेपणा पाचवीला पुजलेला. चांगल्या शाळेत आणि पर्यायाने चांगल्या महाविद्यालयातून इंजिनिअर होऊन बाहेर पडलेला "तो", एका जगप्रसिद्ध कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे.
हा झाला "तो" च्या सामाजिक आयुष्याचा लेखाजोगा; पण खरं तर तो खाजगी आयुष्यात बराच नाखूष होता. अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंगाचे ओझे, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांची जीवघेणी रस्सीखेच आणि आख्खं बालपण कुरतडलेल्या एकटेपणामुळे तरुण वयातच "तो" जरा जास्तच पोक्त झालेला होता. आणि ह्याच्याच जोडीला लहानपणापसून सतत इच्छा माराव्या लागल्यामुळे येन केन प्रकारेण श्रीमंत होण्याचा आसुरी हव्यास चित्त्यासारखा पाठलाग करत होता.
"तो" चं आयुष्य हे तसं पाहिलं तर अगदी सामान्य. आजकालच्या तमासगीर समाजाने त्याच्या आयुष्यात लक्ष घालावे असले काहीही नाही "तो" कडे. मग मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय? अं अं ........ पुढे वाचा. 

एकदा अशीच एक मे महिन्यातल्या शुक्रवारची एक रणरणती दुपार..... अतिशय नयनरम्य असा नदीकाठचा परिसर...... एकच वडाचे झाड. ...... आणि झाडाखालच्या अमृततुल्य अशा थंडगार सावलीत "तो" अतिशय शांतपणे बसलेला. एकटक असा नदीकडे पाहत....अतिशय गार असा वारा वाहतोय.....................एक अनामिक अशी अस्वस्थता आणणारी गुंगी आहे त्या वाऱ्यात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की "तो" नदीकाठी काय करतोय म्हणून?
आदल्या रात्रीचं कामामुळे झालेलं जागरण, सकाळी घरातून निघतांना बाबांशी झालेला वाद, गाडीचे पंक्चर होणे आणि त्यामुळे साहेबांची खावी लागलेली बोलणी आणि ह्या सगळ्यामुळे झालेला मनस्ताप, असे सगळे सोपस्कार पार पडून तो त्या रम्य अशा नदीकाठावर येऊन बसलाय. नेहेमीप्रमाणे एकटाच..........
तसं नदीला बारमाही पाणी नसतं पण कसल्याशा धार्मिक सणानिमित्त धरणातून सोडलं होतं. खळखळ आवाज करत ते पाणी वाहत होतं. कशाचीही तमा न बाळगता एकसारखं वाहतच होतं ते पाणी........
त्या गार वाऱ्यात "तो" ला जरा गुंगी आल्यासारखा झालं. आणि मग सुरु झालं एक संवाद. ........... मनाचा मनाशी की नदीचा "तो"शी.,

नदी: काय "तो" काय चाललाय?
"तो": नेहेमीप्रमाणे एकटेपणातले चिंतन.
नदी: एकटा? कोण एकटा?तू आणि एकटा? इथे मी आहे की? मग?
"तो": तू होतीस, आहेस आणि असशील पण मी एकटा तो एकटाच न?
नदी: अरे "तो", मी असतांना तू एकटा का? मानशील त्या नात्याने मी तुझ्याशी वागू शकते. 
        रणरणत्या उन्हात गार पाण्याचा, मायेचा ओलावा देणारी आई होऊ शकते.
         कशाचीही अपेक्षा न बाळगता सतत वाहत राहा असा वडिलकीचा उपदेश देणारे वडील होऊ शकते.
        अंगावर पाण्याचे शिंतोडे उडवून त्रास देणारी छोटी बहीण होऊ शकते. 
        बोट धरून प्रवाहाबरोबर वाहवत नेऊन जगाचे दर्शन घडवून आणणारा मोठा भाऊ होऊ शकते.
        एवढेच नाही तर सराईत तरुणी प्रमाणे जलक्रीडा करून अगदी तुमची बायको पण होऊ शकते.
"तो": बायको? हा हा हा ....... माझ्याप्रमाणे इतर वाटसरूही तुझे पाणी पितात, आपली पापं तुझ्या पाण्यात धुतात, मग मी तुझ्याकडे बायको म्हणून कसं काय पाहू? कारण बाकी सर्व नात्यांचा मी आधीच 
         अनुभव घेतला आहे. 
         आणि आपल्या  समाजात हे कसे चालेल?
नदी: हा हा हा ...... अगदी रास्त आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलास ना? त्यामुळे तुझं असा विचार करणं अगदी रास्त आहे. मित्रा, तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका आईला कोणतही लहान मुल जड होत      
        नाही. घरी स्वयंपाक बनवला असता जर बाळाचे मित्र जेवायला आले तर आई काय त्यांना जेऊ घालणार नाही का? इथे प्रश्न हा नाहीये की तुझ्या माझ्या नात्याचं नाव काय? किंवा समाज आपल्या 
        नात्याकडे कश्या नजरेने बघतो? महत्त्वाचे हे आहे की आपल्या नात्यामुळे तू खुश आहेस का नाही? कारण कशाचीही तमा न बाळगता वाहत राहणं आणि इतरांना खुश करणं हेच माझं काम आहे. इतकच 
        नाही तर निरपेक्षपणे आणि कशातही किंवा कोणातही गुंतून न पडता मिळेल त्या रस्त्यावरून वाहत राहणं हेही माझंच काम. माझंच काय खरं तर तर प्रत्येकाचंच हे काम आहे.
       "पाहिलं तर वाळवांटातही पाणी दिसते, आणि जर पहायचे नसेलच तर.......... मग प्रश्नच मिटला."
       वाहत राहा मित्रा, तू फक्त वाहत राहा......... अगदी निरपेक्षपणे आणि जगण्याचा आनंद घेत. 

आणि "तो" खडबडून जागा होतो. अर्धवट स्वप्नातून जागा झाल्या सारखा...
आणि समोरच नदीचे पाणी अतिशय आनंदात खळखळ करत वाहत असते...........

(क्रमशः)

आजकालच्या समाजात असे अनेक "तो" आहेत, जे अजूनही नैराश्येच्या गर्तेत अडकले आहेत.... सगळी सुख आहेत पण नेमका जे हवय तेच नाहीये. ही कथा त्या सर्व "तों" ना समर्पित. 

तर कशी वाटली कथा मला नक्की कळवा.  आणि तो पर्यंत मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत राहा.   

Wednesday, 1 February 2012

असं प्रेम करावं

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
मला कविता सुचते ती एखादा प्रसंग पाहून पण यंदा पहिल्यांदा सुचलीये ती एका व्यक्तीला पाहून. त्यामुळे ह्या कवितेचा संपूर्ण श्रेय त्या व्यक्तीला
सहजगत्या सुचली आणि कागदावर उतरवली
तुमच्यासमोर मांडली आणि तुम्हाला पसंत पडली किंवा नाही ते नक्की कळवा........

सगळं तुला देऊन सुद्धा 
माझी ओंजळ भरलेली
पाहिलंस तर तू तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली
...................... चंद्रशेखर गोखले

काळजी घ्या मजा करा आणि मला असेच भेटत रहा. 
  









एकदा प्रेम करावं
कसं करावं तर असं करावं,

लाजत करावं, मुरडत करावं,
इतरांना सांगून करावं,
आधी लपून करावं 
मग जाहीर पणे करावं
पण केल्यावर मात्र बेभान होऊन करावं,
  
रुसून करावं फुगून करावं
भांडून करावं रागावून करावं
समजून करावं समजवून करावं 
ऐकून करावं ऐकवून करावं
मनातलं बोलून करावं 
न बोललेलं ओळखून करावं

एकट्यात करावं ग्रुपमध्ये करावं
सगळ्यांना  सांभाळून करावं
सगळं सांभाळून करावं 
प्रत्येकाच्या मनाचा विचार करून करावं

कधीतरी लाडात येऊन करावं
जमल्यास लाडात येऊन बोलावं,
जर पुणेरी व्यक्ती असल्यास
"बर" इतकच ऐकून करावं 


आठवणीने प्रेम करावं
आठवण काढून प्रेम करावं
एकांतात भेटल्यावर मात्र 
न चुकता तेवढंच करावं 

पारंपारिक पद्धतीने करावं 
कधी नवीन कल्पनांनी करावं
व्यक्ती अरसिक असली तरी
त्या अरासिक्तेवर प्रेम करावं
व्यक्तीला स्वीकारून करावं
आपलंसं करून करावं

सर्व कमावून सुद्धा सगळं गमावून प्रेम करावं
आणि सर्वस्व गमावलं असल्यास काय कमावलं ते आठवून प्रेम करावं

सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे बेधुंद होऊन प्रेम करावं
टेकडीवरच्या खडकाप्रमाणे टणक होऊन प्रेम करावं
कापसाप्रमाणे मऊ होऊन प्रेम करावं
पानावरल्या दवबिंदू प्रमाणे क्षणभरात विरून जाऊन प्रेम करावं
   
पण कधी कधी हे प्रेम एकतर्फी पण करावं
मनात ठेवावं, हळूच दाखवावं
स्वतःला पाहिजे तेव्हा हळूच काढून 
आपलेआपण समजून करावं

पण एकदा तरी करावं 
कसं करावं 
तर ...... 
असं करावं